वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱया मुंबईच्या सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या कामगिरीची आठवण सदैव नवोदित क्रिकेटपटूंना रहावी, यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे वानखेडे स्टेडियममध्ये कायमस्वरूपी खास सुनील गावसकर बॉक्सची स्थापना तसेच या स्टेडियममधील एका स्टँडला दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात येणार आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे 29 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या खास समारंभामध्ये गावसकर बॉक्सचे उद्घाटन तसेच दिलीप वेंगसरकर स्टँडचे अनावरण करण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या समारंभाला सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर तसेच आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे मुंबई क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित केले जाणार आहे. या समारंभाला या तीन व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचे संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.
1971 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विंडीजविरूद्ध सुनील गावस्कर यांनी पदार्पण केले होते. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे गावसकर आणि वेंगसरकर यांचा गौरव करण्याचा निर्णय गेल्याच वर्षी घेण्यात आला होता. या स्टेडियममधील नॉर्थ स्टँडला आता दिलीप वेंगसरकर यांचे नाव दिले जाणार आहे. वेंगसरकर यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 116 कसोटी सामने खेळले आहेत. वानखेडे स्टेडियममध्ये मुंबईचे तीन महान क्रिकेटपटू सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर आणि सचिन तेंडुलकर यांची नावे विविध स्टँडस्ना यापूर्वी देण्यात आली आहेत.









