के. एस. ईश्वराप्पा यांचे प्रतिपादन : अध्यक्ष-पीडीओंचा मेळावा
प्रतिनिधी /बेळगाव
ग्राम पंचायत अध्यक्ष व अधिकाऱयांनी आपले गाव म्हणजे एक कुटुंब समजून त्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी झटावे, असे आवाहन ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी अध्यक्ष व पीडीओंच्या मेळाव्यात केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायतराज व ग्रामीण विकास खाते, अब्दुल नजीरसाब ग्रामीण विकास व पंचायतराज संस्था, जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी गांधी भवन येथे मेळावा झाला. बेळगाव विभागातील ग्राम पंचायत अध्यक्ष व पीडीओंनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता.
रोपटय़ाला पाणी घालून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर ईश्वराप्पा म्हणाले, ग्राम पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळविणे सुलभ नाही. लोकांचा विश्वास मुख्य आहे. अध्यक्षांनी आपल्या कारकिर्दीत जास्तीत जास्त लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. उद्योग खात्री योजनेंतर्गत विकासकामे राबवावीत. नागरिकांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी अशा योजना सहकार्यच ठरणार आहेत.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत ग्राम पंचायत पातळीवर टास्कफोर्स स्थापन करण्यात आली. परिस्थिती हाताळण्यात या टास्कफोर्स यशस्वी ठरल्या. कोरोना परिस्थिती हाताळण्यात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर असून जगात आपला देश अव्वल क्रमांकावर आहे. उद्योग खात्री योजनेंतर्गत जलशक्ती अभियानात 4 लाख 87 हजार 695 कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे राज्याला पहिला क्रमांक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, ग्रामीण विकास व पंचायतराज खात्याच्या मुख्य सचिव उमा महादेवन्, पर्यावरणवादी कार्यकर्ते शिवानंद कळवे, प्रमोद हेगडे, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. आदी उपस्थित होते..









