मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : बांबोळी येथे राष्ट्रीय पंचायत संसदेचे उद्घाटन

प्रतिनिधी /पणजी
पंचायतीच्या सर्व सदस्यांनी, अधिकाऱयांनी गावांच्या विकासाचे स्वप्न पाहावे आणि ते साकार करावे. त्यासाठी सर्व पंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील गावांकरीता 5 वर्षाचा विकास आराखडा तयार करावा आणि त्यासाठी स्वयंपूर्ण मित्राचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा विधानसभा, गोवा सरकार आणि एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हनमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बांबोळी येथील डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय पंचायत संसदे’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष, मिटसॉगचे संस्थापक व संसदेचे निमंत्रक राहुल कराड, सभापती राजेश पाटणेकर, ग्रामविकासमंत्री मिलिंद नाईक, आमदार प्रतापसिंह राणे, मंत्री दीपक पाऊसकर, आमदार क्लाफासियो डायस, विनोद पालयेकर, बाबासान डिसा, कार्तिक कुडणेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, एंजेल फर्नांडिस, मॅच्युले रिबॅनो आणि सुवर्णा तेंडुलकर उपस्थित होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे राहुल विश्वनाथ कराड यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांचा विशेष सत्कार करून मानपत्र व स्मृतिचिन्ह दिले.
योजना पुढे नेण्यासाठी पंचांच्या सहकार्याची गरज
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, पंचायती अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रगतीचे सूत्र घेऊन स्वयंपूर्ण गोव्यासाठी कार्य करावे. ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध योजना पुढे नेण्यासाठी व त्यांचा लाभ पंचायती, तेथील जनतेला मिळवून देण्यासाठी पंचांच्या सहकार्याची गरज आहे. गोव्यातील सरपंचांनी कोविड आणि पुराच्या काळात केलेले कार्य अभिमानास्पद आहे. हे सरकार कोणत्याही एका पक्षाचे नाही तर गोमंतकीय जनतेचे आहे. देशातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आयोजित केलेली ही पंचायत संसद पंचायतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नवा इतिहास रचला : कराड
राहुल कराड म्हणाले, यापूर्वी आम्ही देशातील वेगवेगळय़ा राज्यात या प्रकारच्या संसदेचे आयोजन केले. त्याला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. गोव्यातील या आयोजनाने नवा इतिहास रचला आहे. येथील काही सरपंचांनी आपल्या विकासाच्या माध्यमातून जे कार्य केले आहे ते समाजातील लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न या संसदेतून केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
विकासाचे पर्व पुढे नेण्याची संधी : कवळेकर
चंद्रकात कवळेकर म्हणाले, अशा कार्यक्रमाची गोवा राज्याला खूप गरज होती. सरकारने ती पूर्ण केली. त्यामुळे सर्व पंचायत सदस्यांना एकत्र येण्याची आणि विकासाचे पर्व पुढे नेण्याची संधी मिळाली. त्यातूनच गोव्याचा सर्वांगीण विकास होईल. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचा नारा देऊन येथे विकासाला प्राथमिकता देण्यात येत आहे. हे सरकार अंत्योदय या तत्वावर कार्य करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
लोकशाही मजबुतीसाठी पंचायतींचा सहभाग महत्त्वपूर्ण : राणे
प्रतापसिंह राणे म्हणाले, लोकशाहीला मजबूत करण्यासाठी देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. छोटे राज्य असल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील सर्व समस्या चांगल्या पद्धतीने सोडविण्यास मदत केली जाते. हे राज्य उत्तम प्रकारे विकसित होत आहे.
मंत्री दीपक पाऊसकर, आमदार विनोद पालयेकर, संकल्प सिंघई यांची भाषणे झाली. या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्कृ÷ कार्य करणाऱया सरपंचांचा विशेष सत्कार केला. प्रा. डॉ. गौतम बापट व सुभाष जाण यांनी सूत्रसंचालन केले.









