शिवनदी गाळ उपसा शुभारंभप्रसंगी नाना पाटेकर यांचे आवाहन
प्रतिनिधी/ चिपळूण
नद्यांतील गाळ काढण्याची जबाबदारी एकटय़ा नाम फाऊंडेशनने नव्हे तर आपण सर्वांनी घेतली आहे. प्रशासनही काम करत आहे. आपण सर्वांनी एकमेकांशी जुळवून काम करायचं आहे. आपण ज्याप्रमाणे लग्नकार्याला गेल्यानंतर आहेर करतो. तसे सुरू असलेल्या गाळ उपशाचे कार्य आपलं वाटण्यासाठी फार लाखानं, हजारानं नव्हे तर जमेल तसा थोडाफार हातभार लावावा. गाळ उपसा हा एक यज्ञ आहे. ज्याप्रमाणे यज्ञात एक-एक समिधा आपण टाकत असतो. तसेच या उपक्रमालाही सहकार्य करावे, असे आवाहन नाम फाऊंडेशनचे संस्थापक व ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मंगळवारी येथे केले.
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुमारे साडेसात कि.मी. लांबीच्या शिवनदीच्या गाळ उपशाला मंगळवारी पाटेकर यांच्याहस्ते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुळातच सरकारी कामाची आपल्याला तेवढी दखल नसते. त्यामुळे कुठलीही गोष्ट जाळतो, तोडतो, फोडतो का तर ती माझी नाही तर सरकारची आहे. मात्र मुळातच ज्यावेळी सरकार माझं आणि मी सरकारचा आहे, हे ज्या दिवशी आपण मानायला लागू, त्या दिवशी सारेच अतिशय सोपं होणार आहे. पण चार भिंतीच्या पलिकडचं माझं काहीच नाही, ही आपली वृत्ती काढून टाकायला हवी. पण चिपळूणचं तसं नाही. नामचं ज्यावेळी काम सुरू झालं, त्यावेळी रस्त्याच्या बाजूला घमेलं घेऊन म्हातारी उभी होती. मला पहिल्यानंतर तिने घमेलं बाजूला ठेवून कनवटीला कुठली तरी असलेली नोट काढून माझ्या हातावर ठेवत हे बाबा घे. मला वाटतं, त्यावेळी दिलेलं 50 रुपये आजला मला 50 कोटी वाटतात. कारण ती भावना तिथपर्यंत रूजलेली आहे. त्यामुळे येथील गाळाचं काम छानच होणार. पुढच्यावर्षी पुराचा त्रास होणार नाही, हे निश्चित.

गाळ उपशाचं काम सगळय़ांनी मिळून आणि एकत्र येऊन हे करायचं आहे. चार भिंतीच्या पलिकडचेही आपले आहे. झाडे आपली तसे डोंगर, आभाळ आपलं आहे. प्रत्येक गोष्ट नावावर असण्याची गरज नाही. आज इथली एव्हढी मंडळी मला मिळाली ती सर्व माझ्या नावावर झाली. त्याची किंमत करता येत नाही. ज्यावेळी माझं नातं तुमच्याबरोबर जडतं ते कायमस्वरूपी असेल तर मग आपण आपल्या सर्व बाजूच्या भिंतीपलिकडचं आपण पाहू शकतो आणि ते पाहायला शिकलं पाहिजे. नेमकं परतीच्या वाटेवर असताना बोलावणं कधी येईल ते माहित नाही आणि कधी परतीची वाट सुरू होते, हे ही माहिती नाही. त्यामुळे जे काही छान करता येईल ते करूया. त्यासाठी उद्याची वाट कशाला पहात रहायचं आणि हे आम्ही नाही आपण सर्व करत आहोत. नाम म्हणजे काय? लोकांनी दिलेल्या पैशातून लोकांसाठी काम करत आलेलो आहोत.
सर्वात वाईट गोष्ट अशी की, आज आपल्या मंडळींची गावाकडची नाळ तुटलेली आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी काम सुरू आहे. तेथे तरुण मुलेच नाही. सर्वांना पंख फुटलेत. ती सर्व शहरात निघून गेल्याने आज वयोवृध्द मंडळी गावात राहिली आहेत. त्यावेळी वाईट वाटते. ज्यावेळी मी नवीन मुलगा म्हणून जन्माला येतो, त्यावेळी माझी जबाबदारी आहे की, माझ्या गावाची जबाबदारी उचलणं. तरुणांना माझी विनंती आहे की, तुम्ही गावात नंदनवन तयार करा, शहरात नंदनवन नाही आहे. शहरातील माणसे आता गावाकडे वळू लागली आहेत. मी गावातच राहतो. शहरात कसे आम्ही स्वेअरफुटमध्ये रहातो. शहरातील मंडळींना आभाळ पहाता येत नाही. कारण तिथे सतत काम आणि पैसे कमवणे यामध्ये वेळ जातो. मात्र इथे आम्ही मोकळं आभाळ, पक्षी पहायला मिळतात. झाडे, मोकळी हवा आहे ते सांभाळण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी जिल्हाधिकाऱयांसह स्थानिक प्रशासनाचं तोंडभरून कौतुक केलं. त्यांच्यामुळेच गाळाचा प्रश्न निकाली निघत असल्याचे नमूद केले.
प्लास्टिक बंदीचे आवाहन
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले की, पुराच्यावेळी घरांघरातून प्लास्टिक बाटल्या घरात आल्या होत्या. त्यामुळे यापुढे प्रतिबंधित प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईबरोबर आपण सर्वांनी चळवळ राबवूया, असे आवाहन केले.
यावेळी नाम फाऊंडेशनचे मल्हार पाटेकर, गणेश थोरात, समीर जानवलकर, महेंद्र कासेकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, चिपळूण बचाव समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.









