प्रतिनिधी/ मुंबई
बॉलिवूड संगीताला पॉपचा तडका देणारे, पडद्यावर गाणं लागलं तरी पाय थिरकायला लावणाऱया संगीताचे जादुगार आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवणारे गायक, संगीतकार बप्पी लहिरी तथा अलोकेश लहिरी यांचे 15 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाने आणि अनोख्या अंदाजाची छाप पाडणारे बप्पी लहिरी यांनी ‘बप्पी दा’ म्हणून रसिकांच्या मनावर 48 वर्षांच्या संगीत कारकिर्दीत राज्य केले.
बॉलिवूडमध्ये ‘डिस्को, पॉप, रॉक’ म्युझिकचा समावेश करण्यात आणि त्याला प्रसिद्ध करण्यात बप्पी लहिरी यांचा मोलाचा वाटा होता. गाणं केवळ गायचं नसतं तर ते परफॉर्मदेखील करायचं असतं. हा ट्रेंड बप्पी लहिरी यांनी 70 ते 80 च्या दशकात सुरू केला. त्यामुळे त्यांचा स्टेज परफॉर्मन्स पाहताना गाण्याबरोबरच ते त्या गाण्यावर डान्सस्टेप देखील करायचे आणि हाच अंदाज त्यांच्या चाहत्यांना खूप आवडायचा. सोन्याच्या चेननी भरलेला गळा आणि ठसठशीत अंगठय़ांनी सजलेली हाताची पाचही बोटे व डोळय़ावर गॉगल हा त्यांचा लूक कायमच चर्चेत राहिला आहे. अनेक रिएलिटी शोमध्ये त्यांनी परीक्षकांच्या भूमिकेत राहून नव्या कलाकारांना, गायक, संगीतकारांना मार्गदर्शन केले आहे.
बप्पी लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी कोलकाता येथे झाला. आपल्या वेगळय़ा शैलीमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. बप्पी लहिरी यांची इंडस्ट्रीत 48 वर्षांची कारकीर्द होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 5 हजार गाणी संगीतबद्ध केली आहेत. यामध्ये त्यांनी हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, ओरिया, भोजपुरी, आसामी भाषा तसेच बांगलादेशी चित्रपट आणि इंग्रजी गाणीही संगीतबद्ध केली.
लहानपणापासूनच बप्पी लहिरी यांना लोकप्रिय होण्याचे स्वप्न पडत होते. पण, त्यांनी केवळ हे स्वप्न न पाहता हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी खूपच मेहनत केली. वयाच्या तिसऱया वर्षी त्यांनी तबला वादनाचे प्रशिक्षण घ्यायला सुरू केले. बंगालमधील एका श्रीमंत व संगीताविषयी आस्था असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अपरेश लहिरी हे बंगालमधील एक प्रख्यात गायक होते. तर आई बासरी लहिरी या बंगाली संगीतकार होत्या. बप्पी लहिरी यांचे संगीत शिक्षण हे आई-वडिलांकडूनच सुरू झाले. प्रख्यात गायक आणि अभिनेता किशोर कुमार तसेच एस. मुखर्जी हे बप्पी लहिरी यांचे नातेवाईक असल्याने सिनेमा संगीतविषयी बप्पी लहिरी यांना लहानपणापासूनच दिशा मिळत गेली. वयाच्या 19 व्या वर्षी दादू या बंगाली सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा गाणे गायिले.
बप्पी लहिरी यांची कारकीर्द ही बॉलिवूडमध्ये 1970-80 च्या काळातील आहे. या काळात त्यांनी चलते चलते, डिस्को डान्सर, शराबी आदी चित्रपटांमध्ये हिट गाणी दिली. 2020 मध्ये आलेल्या बागी 3 या सिनेमातील भंकस हे त्यांचे बॉलिवूडमधील शेवटचे गाणे ठरले. गेल्या वर्षी बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी या आजारावरही मात केली होती. त्यानंतर त्यांचा आवाज गेल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण त्यांनी त्या खोटय़ा ठरवल्या.
वैशिष्टय़पूर्ण शैलीने अजरामर गायक, संगीतकार ः मुख्यमंत्री
सहज सोप्या, उडत्या चालींच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा निखळ असा गायक, संगीतकार बप्पी लहिरी यांच्या निधनाने काळाने हिरावून नेला आहे. बप्पी लहिरी संगीत क्षेत्रातील आपल्या वैशिष्टय़पूर्ण शैलीमुळे अजरामर राहतील, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बप्पी लहिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.









