रात्री नऊ साडेनऊची वेळ.पं. रघुनंदन पणशीकर रंगमंचावर स्थानापन्न झालेले. सुंदर जुळलेल्या तानपुऱयांच्या झंकारामध्ये त्यांचा अतीव गोड,अतिसुरेल, दमदार ’सा’ मिळून गेला आणि थोडय़ा आलापीनंतर मिस्किल अंदाजात त्यांनी रागाचं नाव सांगितलं. आणि मग यमनची अशी काही कलाकुसर श्रोत्यांना ऐकायला मिळाली की तास कधी संपला ते कुणालाच कळलं नाही. त्या गाण्याने कान आणि मन श्रीमंत होत असतानाच मला त्यांची मुलाखत आठवली. आपल्या गुरुंची संगीताप्रति असलेली नि÷ा पाहून आपलाही दृष्टिकोन घडला हे त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. आणि मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्यांचा सार्वकालिक शिष्यभाव! हे सगळं आठवताना आणि समोरचं गाणं मनात साठवताना माझ्या मनात आलं की आपल्याला उत्तम गायक व्हायचं आहे हे मनात धरून शिकणाऱयाकडे किती बरं गुण आढळतात?
उत्तम कलाकार होण्यासाठी पहिला आवश्यक गुण म्हणजे मुळात त्या गोष्टीची अतिशय आवड असणं हे असावं. आणि त्याचबरोबर येणारी जोड म्हणजे त्यात असणारी नैसर्गिक गती किंवा समज. कारण आडात असल्याशिवाय पोहऱयात कुठून येणार? मोठमोठय़ा कलाकारांविषयी आपण ऐकतो की त्यांना लहान वयापासूनच आवड होती. त्यात ते मूल रमून जात असे. किंवा कुमार गंधर्वांसारख्या व्यक्तीविषयी,त्यांनी वयाच्या नवव्या वषीच मैफल गाजवली असं वाचनात आलेलं. किंवा ना. धों. ताम्हनकर यांच्या ’खडकावरला अंकुर’ या पुस्तकात व्यावहारिक शिक्षणात आवड नसणारा मुलगा योग्य दिशा मिळताच भराभर गाणं शिकून पुढे कुमार किन्नर ही पदवी प्राप्त करतो ही वाचलेली कथा मी विसरूच शकत नाही. समोरच्या बुवांना वेडावून दाखवण्यासाठी त्यांच्या गाण्याची नक्कल करणारा छोटा मुलगा पुढे जाऊन दरबार गायक बनतो हीही अशीच अचंबित करणारी गोष्ट! अशी ही उपजत आवड.
त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे त्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये झटण्याची तयारी आणि चिवट इच्छाशक्ती. या वेडापायीच पं. भीमसेन जोशी तेराव्या वषी घरातून पळून जाऊन चक्क जालंधरपर्यंत पोहोचले होते. कारण हे वेड स्वस्थ बसू देणं अशक्मय असतं. चांगल्या सधन घराण्यातले असलेले पं. जितेंद्र अभिषेकी बुवा अनाथ विद्यार्थीगृहात राहून शिकले. तेही असेच घर सोडून बाहेर पडले होते. आत्ता आमच्या पिढीतल्या लोकांना गाणं ऐकण्यासाठी किंवा शिकण्यासाठी खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत पण त्यावेळी त्या सगळय़ाची वानवा असताना घर सोडून शेकडो मैल जाणं, अपमान, निंदानालस्ती भोगणं आणि मोठं होणं यासाठी केवढी प्रबळ इच्छाशक्ती हवी? आपण शिकणारच, जोपर्यंत गाणं जमत नाही तोपर्यंत करणारच, भले त्यासाठी कितीही कष्ट पडोत. वेळोवेळी येणाऱया अडचणी दूर होईपर्यंत मी अखंड प्रयत्न करणार आणि यशस्वी होणारच असं सतत मनात धरून राहणं म्हणजेच ही जिजिविषा होय! आजारानं ग्रासलेला कलाकार जेव्हा बिछान्यावर पडल्या पडल्या म्हणतो की आता मला गाणं दिसतंय. आणि अनेक नवीन रागांची निर्मिती होते. या इच्छाशक्तीला सलाम करावासा वाटतो कारण ही जन्म देते ती ध्यासाला.
एकदा ध्यास लागला की दुसरं तिसरं काहीच सुचत नाही. अर्धवट शिक्षण झालेला मुलगा, ज्याला धड गाणं मिळालं नाहीये आणि शिक्षणही झालं नाहीये. आई-वडील चिंता करतायत की मुलाचं पुढे कसं होणार. त्यात त्याचं वयही आडनिडं. व्यसनी होण्याचा धोका. पण मुलगा अतिशय स्थिरबुद्धी. रात्रंदिवस अक्षरशः तारेत असल्यासारखं त्याच्या गळय़ात गाणं आणि मनातही अखंड गानयज्ञ. लोक मूर्खात काढतायत, याला आयुष्यात काहीच जमणार नाही असं म्हणतायत आणि मुलगा पूर्ण उन्मनी अवस्थेत. एक दिवस कोंडी फुटते आणि गरुड झेप घेतो. हा ध्यास. जुन्या पिढीतल्या लयभास्कर खाप्रूमाम पर्वतकर यांची कथा नुकतीच वाचली. ते गाढ झोपेत होते. हाताची बोटं सतत लयीत हलत होती. पाहणाऱया व्यक्तीची खात्री झाली की ते जागे आहेत. पण त्यांच्या चिरंजिवांनी ठामपणे सांगितलं, नाही. ते झोपेतच आहेत. आणि हाकाही मारल्या,पण त्यांना जाग आली नाही. कमाल आहे ना! मनाला झोपेतही दुसऱया कशाचं भानच नाही. लयब्रह्माशीच एकाकार. याला म्हणतात ध्यास. गाडीवरून माणूस निघालेला असतो. डोक्मयात गाणं असतं. मग गाडीच्या इंजिनाचा आवाज ’सा’ होतो. बाजूनं जाणाऱया गाडीचा आवाज ’रे’ होतो. हॉर्नचा आवाज ’नि’ होतो. गोंगाटाचे स्वर होतात आणि तासनतास गाणं रंगतं. मैफिलीपेक्षाही भारी. ध्यासाशिवाय दुसरं काय? याच ध्यासाने दगडापासून शिल्प घडतं. कारण यामागे अतूट श्रद्धा व नि÷ा असते.
आपण कोणतंही काम करताना ते श्रद्धेने आणि नि÷sने केलं तर वेगळी पूजा करण्याची गरजच राहत नाही. इथे तर साक्षात संगीत आहे. आणि त्याची आराधना करताना अतूट श्रद्धेचा आणि नि÷sचाच पाया असावा लागतो. एका व्यक्तीला एकदा गुरू म्हणून मानलं की ती जे काही आपल्याला शिकवेल ते गाण्यावर आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवून नि÷sने शिकणं अपेक्षित असतं. सुरवातीला उल्लेख केलेल्या पं. पणशीकरांच्या मुलाखतीत त्यांनी हेही सांगितलं होतं की एक दिवस प्रकृती बरी नसल्यामुळे ते तालमीला जाऊ शकले नाहीत. तसं त्यांनी गुरुमातेला कळवल्यावर त्या पटदिशी उद्गारल्या, ‘मग काय झालं? अरे अंगात दोनपर्यंत ताप असताना मी गाते ना रे!’ किंवा पं. वसंतराव देशपांडे ’तानपुरा आणि मी’ असं म्हणतात. किंवा पं. व्यंकटेश कुमार गाणं या विषयावर बोलताना गहिवरून येऊन भक्तिभावाने बोलतात. उगाच नाही त्यांच्या ‘गानविद्या बडी’ या बंदिशीत अनन्य समर्पण भाव भरभरून वाहत! हे सगळं पाहिलं की कळतं या लोकांची श्रद्धा नि÷ा म्हणजे काय असते ती! आमच्या सिंधुदुर्गात होणाऱया ‘नादब्रह्म संगीत समारोह’ चा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. आम्हा ऐकणाऱयांना राहवेना. संयोजकांपैकी एका व्यक्तीला भेटून मी त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानले. आणि अनेक अडचणींना, टीकेला तोंड देऊनही त्यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आमच्यातील वृद्धांनी त्यांचं कौतुक केलं. तर ते म्हणाले, जमेल तसं करतो आहोत. अभिषेकीबुवांनी आम्हाला सांगितलं होतं की सावंतवाडीत तानपुरे वाजत राहिले पाहिजेत. ते कुठून तरी पाहतायत आमची धडपड. ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल आता.” त्यांची ती वाक्मय, डोळय़ात तरारलेलं पाणी आणि नजरेतला भाव आम्ही विसरूच शकत नाही. नि÷ा, श्रध्दा म्हणजे आणखी वेगळं काय असतं हो? (क्रमशः)
अपर्णा परांजपे-प्रभु








