प्रतिनिधी / पंढरपूर
भंडीशेगाव, वाखरी परिसरात काही दिवसापूर्वी बिबट्या सदृश प्राण्याची दहशत पसरली होती. वनविभागाकडून मात्र तो प्राणी बिबट्या नसल्याचे सांगण्यात येत होते. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गादेगाव सीमेलगत पळशी बोगद्याजवळ माऊली नागणे यांना बिबट्या आढळून आला आहे.
भंडीशेगाव व वाखरी परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत होते. वनविभागाला मात्र ठोस पुरावे न मिळाल्यामुळे त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही होत नव्हती. सोमवारी अचानक बिबट्या दिसल्याने आसपासच्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. नागरिक व जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून वनविभाग बिबट्यास जेरबंद करण्यास प्रयत्न करीत आहेत.









