नगराध्यक्षांकडून त्वरित कामे करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी पालिकेचे अभियंता तसेच गांधी मार्केट विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱयांना घेऊन सदर मार्केटच्या दुरुस्तीसाठीच्या कामांची पाहणी केली व ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. गांधी मार्केट संघटनेचे पदाधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांनी नगराध्यक्ष पेरेरा यांना गांधी मार्केटमध्ये काही तातडीची दुरुस्तीकामे करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून यासंदर्भात पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी ही पाहणी करण्यात आली.
गांधी मार्केट इमारतीच्या छपराला गळती लागलेली असल्याने पाणी झिरपणे तसेच काँक्रिटचे तुकडे पडण्याचे प्रकार मागील काही पावसाळय़ांपासून आढळून येत असल्याने या इमारतीवर पत्र्यांचे छप्पर घालण्याची सूचना संघटनेकडून करण्यात आली. गांधी मार्केटच्या सभोवतालील गटारांतील गाळ उपसला गेलेला नाही. काही ठिकाणी गटारांवर फरशा नसल्याने गाळ उपसला, तरी गटारांत अन्य साहित्य गोळा होऊन ती तुंबतात. त्यामुळे उघडय़ा गटारांवर लाद्या घालण्याची गरज आजगावकर यांनी मांडली.
गेली दहा वर्षे गांधी मार्केटमधील रस्त्याच्या कामाची निविदा काढूनही स्थानिक आमदारांना हॉटमिक्स डांबरीकरण करणे जमले नसल्याची टीका आजगावकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली. नगराध्यक्ष पेरेरा यांनी आवश्यक दुरुस्तीकामांची नोंद अभियंत्यांनी घेतली असून ही सर्व कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे आश्वासन संघटनेला दिले.









