कॅन्टोन्मेंट अधिकाऱयांनी केली होती पाहणी : वर्ष उलटले तरी पथदीप दुरुस्तीकडे दुर्लक्षच : रस्ता वर्दळीचा असल्याने पथदीप सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदीपांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील डेअरी फार्म ते गांधी चौकापर्यंतच्या रस्त्यावरील पथदीप खराब होऊन दोन वर्षे उलटली. याची पाहणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व साहाय्यक कार्यकारी अभियंते सतीश मण्णूरकर यांनी केली होती. पण वर्ष उलटले तरी अभियंत्यांनी या समस्येकडे कानाडोळा केला असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या असून याबाबत नागरिक कॅन्टोन्मेंट कार्यालयात तक्रारी करीत असतात. पण याबाबत कोणतीच कारवाई केली जात नाही. तसेच नागरिकांच्या समस्यांशी काही देणे-घेणे नसल्याप्रमाणे कॅन्टोन्मेंटचे अधिकारी वागत आहेत.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील डेअरी फार्म ते गांधी चौकापर्यंतचे पथदीप खांब व पथदीप खराब झाले आहेत. वाहनाच्या धडकेने डेअरी फार्म परिसरातील पथदीपाचा खांब कोसळला होता. परिणामी या मार्गावरील पथदीप पूर्णपणे बंद झाले होते. सदर रस्ता वर्दळीचा असल्याने नवीन विद्युतखांब बसवून पथदीप सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही.
मनमानी कारभाराबाबत नाराजी
या समस्येबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्वा यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे बर्चस्वा यांनी साहाय्यक कार्यकारी अभियंते सतीश मण्णूरकर यांच्या समवेत पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली होती. विद्युतखांब बसविण्यासाठी हेस्कॉमकडे पाठपुरावा करण्याची सूचना बर्चस्वा यांनी साहाय्यक कार्यकारी अभियंते सतीश मण्णूरकर यांना केली होती. पण अद्यापही विद्युतखांब बसविण्यात आला नसल्याने पथदीप सुरू करण्यात आले नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या सूचनेला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. अधिकाऱयांच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी या मार्गावरील विद्युतखांबाची उभारणी करून पथदीप सुरू करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.