उचगांव /प्रतिनिधी
किमान वेतन मिळण्यासाठी अडसर ठरणारा वसुली व उत्पन्नाची अट घालणारा शासन निर्णय तातडीने रद्द करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना-आयटक संलग्न यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनात करवीर तालुक्यातील गांधीनगर, वळीवडे सरनोबतवाडी येथील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले.
गांधिनगर, वळीवडे येथील ग्रामपंचायतीच्या मुख्य द्वारासमोर सर्वच्या सर्व कर्मचारी एकत्र आले. किमान वेतनात अडसर ठरणारा वसुली व उत्पन्नाची अट असलेला शासन निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली. या शासन निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. सफाई कामगार, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी आदि सर्व विभागातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. गांधीनगरच्या उपसरपंच सोनी सेवलानी, ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे, प्रताप चंदवाणी, सुनीता तेहल्याणी व स्वाती चंदवाणी यांनी तसेच सरनोबतवाडी येथे संदिप संकपाळ यांनी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य शासनाने त्वरित मंजूर कराव्यात, अशी मागणी करत काम बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.









