बेकायदेशीर लसीकरणाची विभागीय चौकशी करत बदलीची मागणी
उचगाव / वार्ताहर
गांधीनगर वसाहत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या पॉल यांची बेकायदेशीर होणारे लसीकरण व अन्य मनमानी गैरकारभाराची चौकशी व्हावी, नागरिकांशी अरेरावीने बोलणार्या डॉ. पॉल यांची त्वरीत बदली करण्यात यावी अशी मागणी गांधीनगर आम आदमी पार्टी व समाज सेवा संघाचे अध्यक्ष दीपक नंदवानी यांनी सिंधी सेंट्रल पंचायत येथे विविध संघटना आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत केली.
ते पुढे म्हणाले डॉ.पॉल मनमानी कारभार करत असून कधी त्या लोकांना टोकण घेण्यास सांगतात, तर कधी रांगेत उभा राहायला सांगतात, उपलब्ध लस व नागरिकांना दिलेली लस याबाबत तफावत आढळून येत आहे. सकाळी सहापासून लसीकरणासाठी रांगा लागतात. शंभर एक लोकांना लस दिली जाते व दुपारी तीनच्या दरम्यान लस संपल्याचे जाहीर केले जाते. त्यानंतर मागील दरवाजातून विशिष्ट लोकांना लस दिली जाते. प्राधान्य लोकांचे नाव पुढे करून ४० ते ५० डोस राखीव ठेवण्यात येतात ही बाब संशयास्पद आहे.
आपली सदोष कृत्ये लपवण्यासाठी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करेन असे सामाजिक कार्यकर्त्यांना डॉ. पॉल धमकावत आहेत. त्यामुळे त्यांच्या कारभाराची चौकशी होऊन त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी नंदवानी यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उपसंचालक यांना निवेदन दिल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीस सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गोवालदास कट्यार, उपाध्यक्ष लीलाराम मनचुडिया, गांधीनगर भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष मनोज बचवानी, लोकनियुक्त सरपंच रितू लालवानी, होलसेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक टेहलानीजी पी ग्रुपचे अध्यक्ष राकेश सचदेव उपस्थित होते.









