उचगाव / वार्ताहर
घराच्या नवीन बांधकामावर पाणी मारत असताना पाण्याच्या टाकीत पडून यमनाप्पा महालिंगाप्पा बाली वय ५० सध्या रा. बेघर वसाहत चिंचवाड ता. करवीर मुळगाव जालबाद ता. सिंदगी जि. विजापूर या बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
गांधीनगर येथील श्रीचंद नेरूमल मोटवानी यांचे बरँक नंबर ४३ / ४ यांच्या घराचे नवीन बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामावर गवंडी म्हणून यमनाप्पा बाली हा काम करत होता. शनिवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर आला होता. नवीन बांधकाम असल्याने झालेल्या बांधकामावर पाणी मारण्याचे काम त्यांनी सुरू केले. दरम्यान दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तो पाण्याच्या टॉकीत पडला. काही वेळाने ही घटना त्याच्या सोबत काम करणाऱ्या कामगाराने पाहिली. त्यांनी बांधकाम मालकास आणि कंत्राटदारास कळवली. त्यानंतर त्याला उपचारासाठी गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून याबाबतची फिर्याद बांधकाम मालक श्रीचंद नेहरूमल मोटवानी यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष सुदर्शनी करत आहेत.









