चोरटय़ांनी दानपेटीतील रक्कम, आठ मूर्ती पळविल्या : घटनेमुळे परिसरात खळबळ

प्रतिनिधी /बेळगाव
मारुती रोड, गांधीनगर येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. चोरटय़ांनी दानपेटी, पितळी मूर्ती व पूजेचे साहित्य पळविले आहे.
भरमू पंडीत हे नेहमीप्रमाणे पूजेसाठी सोमवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास जैन मंदिरात पोहोचले. त्यावेळी मंदिराचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला. तातडीने त्यांनी समाज बांधवांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर माळमारुती पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. दर्शनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी मंदिरात प्रवेश केला होता.
चोरटे एखाद्या वाहनांतून आले असावेत, असा संशय आहे.
चोरटय़ांनी दानपेटीही पळविली आहे. या दानपेटीत सुमारे 68 हजार रुपये रक्कम होती. तीर्थंकरांच्या सहा मूर्ती, ज्वालामालीनीची मूर्ती, आठ अष्टमंगळ असा सुमारे 2 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे. या संबंधी भरमू नानाप्पा उपाध्ये यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार रविवारी दुपारी 4 वाजता मंदिराच्या दरवाजाला कुलूप लावण्यात आला होता. सोमवारी सकाळी भरमू हे पूजेसाठी आले त्यावेळी मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरटय़ांनी साऊंड सिस्टीमही पळविली आहे. भर वस्तीत झालेल्या चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.









