वार्ताहर / उचगांव
गांधीनगरसह वळीवडे, चिंचवाड व गडमुडशिंगी परिसरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद देत ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी गांधीनगर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला. हा जनता कर्फ्यू रविवार (दि.19) अखेर चालू राहणार आहे. गांधीनगरच्या उपसरपंच रितू उर्फ सोनी सेवलाणी यांच्या अध्यक्षतेखाली व वळीवडेचे सरपंच अनिल पंढरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते.
गांधीनगर मेन रोड वरील तावडे हॉटेलपासून चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंतची सर्व होलसेल व रिटेल दुकाने बंद राहिली. छत्रपती शिवाजी मार्केट, सिंधू मार्केट, गुरुनानक मार्केट, स्वस्तिक मार्केट, मोहिते मार्केट, झुलेलाल मार्केट आदि सर्वच मार्केट बंद राहिल्याने संपूर्ण बाजारपेठेमध्ये शुकशुकाट होता. जनता कर्फ्यूला बाजारपेठेतील सर्व घटकांनी सहभाग दर्शविला. होलसेल, रिटेल व्यापारी असोसिएशन व सिंधी सेंट्रल पंचायतसह सामाजिक संस्था तसेच सर्व व्यापारी व ग्रामस्थांनी या कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहिल्या. ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल वळीवडेचे सरपंच अनिल पंढरे, गांधीनगरच्या उपसरपंच सोनी सेवलाणी, ग्रामविकास अधिकारी बी डी पाटील यांनी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Previous Articleपाण्डव निवाले संपूर्ण
Next Article बँक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम होतेय गायब








