वार्ताहर / उचगांव
गांधीनगर (ता. करवीर) येथील सि.स.नं.१७२६ वरील विनापरवाना बेकायदेशीर बांधकाम सात दिवसांची नोटीस देऊन पाडण्यात यावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी गांधीनगर ग्रामपंचायतीस दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात या वादग्रस्त विनापरवाना बांधकामाबाबत सुनावणी झाल्यानंतर हा आदेश देण्यात आला
या बांधकामाबाबत सामाजिक कार्यकर्ते धीरज तेहल्यानी व राजू कांबळे यांनी तक्रार केली होती. पैकी राजू कांबळे सुनावणीस उपस्थित राहिले नाहीत. धीरज तेहल्ल्यानी यांनी आपल्या तक्रारीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे सादर केले. त्यावर हे बांधकाम विनापरवाना झाल्याचे ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांनी कबूल केले. तक्रारदार तेहल्यानी, सरपंच रितू लालवाणी, विस्ताराधिकारी संदेश भोईटे व ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमन मित्तल यांनी सि.स.नं.१७२६ वरील बांधकाम सात दिवसांची नोटीस देऊन पाडण्यात यावे. जर ही कारवाई झाली नाही तर त्याचे कारण २२ जूनपूर्वी म्हणजेच पुढील सुनावणीपूर्वी सादर करावे असा आदेश दिला.
दरम्यान, गांधीनगरमध्ये अशा प्रकारची एकूण किती बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत व त्यांच्यावर ग्रामपंचायतीने काय कारवाई केली याबाबतचा अहवाल ग्रामपंचायतीने पुढील सुनावणीच्या पूर्वी जिल्हा परिषदेकडे सादर करावा, असेही आदेशात नमूद केले आहे.








