रोकड, घडय़ाळ पळविले, दोन एटीएम कार्डचाही वापर करून रक्कम केली लंपास
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगरजवळ कार उभी करुन लघुशंकेला गेलेल्या पट्टणकुडी (ता. चिकोडी) येथील वृद्धाला एका जोडगोळीने लुटले आहे. काठीने मारहाण करुन रोकड व घडय़ाळ पळविण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली असून शुक्रवारी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तम्माण्णा मलगौडा सोमण्णावर (वय 61, रा. पट्टणकुडी) यांना मारहाण करुन लुटण्यात आले आहे. या प्रकरणी माळमारुती पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तम्माण्णा यांनी बेंगळूर येथे नवीन कार खरेदी केली होती. मुलगा व त्याच्या मित्रासमवेत बेंगळूरहून गुरुवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास ते बेळगावला पोहोचले. गांधीनगरजवळ कारमध्ये गॅस भरण्यासाठी ते थांबले होते. त्यावेळी तम्माण्णा लघुशंकेसाठी थोडय़ा अंतरावर गेले. त्यांना गाठलेल्या दोघा जणांनी काठीने मारहाण करुन त्यांच्या खिशातील 1230 रुपये रोख रक्कम व एक घडय़ाळ पळविले.
एटीएममध्येही नेले
याचवेळी तम्माण्णा यांच्या खिशात दोन एटीएम कार्ड होते. लुटारुंनी त्यांना कणबर्गी रोडवरील एसबीआयच्या एटीएममध्ये नेले. दोन्ही कार्डचा वापर करुन 20 हजार रुपये काढून घेतले व त्यानंतर तम्माण्णा यांची सुटका करण्यात आली. तोपर्यंत कारमध्ये बसलेला त्यांचा मुलगा व त्याच्या मित्राला या घटनेची पुसटशी माहितीही नव्हती.
लघुशंकेला गेलेले वडील तास उलटला तरी का आले नाहीत? म्हणून त्यांचा मुलगा त्यांना शोधत होता. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास तम्माण्णा आपल्या कारजवळ पोहोचले. मुलाला घडला प्रकार सांगितला. मात्र नव्या कारची पूजा करायची होती म्हणून हे कुटुंबीय थेट आपल्या गावी गेले. शुक्रवारी या संबंधी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान उपलब्ध माहितीनुसार पोलिसांनी सीसीटीक्हीच्या फुटेजवरुन या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार यांच्याशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला आहे. चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
भिंतीच्या बांधकामासाठी पोलिसांकडूनही लूट
माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोऱया, घरफोडय़ा व लुटमारीच्या घटनांत वाढ झाली आहे. याच परिसरात मोठय़ा प्रमाणात जुगारीअड्डेही सुरू आहेत. गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी असलेले पोलीस जुगारी अड्डे चालकांना संरक्षण पुरविण्यात गुंतले आहेत. त्यामुळे या परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात आर्थिक व्यवहारही मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. संरक्षक भिंत बांधायची आहे असे सांगत पोलीस स्थानकात येईल त्याला लुटण्याचा सपाटा सुरू आहे. कणबर्गी रोडवर वाहने अडवून वाहन चालकांना लुटण्यात येत आहे. पोलीस स्वतःच लुटमारीत गर्क असल्याचे यावरुन दिसून येते. वरि÷ पोलीस अधिकारी याकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.









