प्रतिनिधी / कोल्हापूर
महात्मा गांधीजी यांना रामाची हिंसा नव्हे, तर त्यांची मर्यादापुरूषोत्तमता अभिप्रेत होती. त्या मर्यादांचा आदर्श आपण घ्यायला हवा. गांधीजींचे रामराज्य सामाजिक न्याय, समता, समानता आणि आदर्श समाज प्रस्थापनेचे प्रतीक आहे. आपली दांभिकता सोडून महात्मा गांधीजींचे विचार समजून घेतले तर राष्ट्रसुधारणा होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, लेखक व सामाजिक कार्यकर्ते तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित `भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि महात्मा गांधी’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्राr यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तुषार गांधी म्हणाले, महात्मा गांधींजींच्या स्वप्नातल्या भारताची संकल्पना आदर्श रामराज्याची आहे. गांधीजींना दुर्बल घटकाच्या आवाजाला महत्व देणारे प्रजासत्ताक अभिप्रेत आहे. यामध्ये गरीब-श्रीमंत, धर्म-जात, प्रांत-भाषा असा कोणताही भेद असेल. समताधिष्ठित समाजात प्रत्येकाला न्याय मिळेल. परंतू सध्या श्रीमंतांना आपल्या संपत्तीचे काय करायचे असा प्रश्न आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतरही देशातील विषमता चिंताजनक आहे. कोरोनात ही विषमता प्रकर्षाने जाणवली अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, देशाच्या विकासाच्या संकल्पनेचाही फेरविचार व्हावा. विकास करताना एखादा महामार्ग, उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांना सवलतीत, शेतकऱयांच्या मोफत जमिनी दिल्या जातात. त्या बदल्यात शेतकऱयांच्या वारसाला हलक्या दर्जाची नोकरी मिळते. त्यामुळे विकास प्रक्रियेत बलिदान देणाऱयाला नव्हे तर दुसऱयालाच लाभ मिळतो. नफेखोरी बंद झाली की उद्योग बंद होवून, जमिनीही गायब होतात. यात नुकसान होते फक्त शेतकऱयांचे, गावकऱयांचेच. ही राष्ट्रभर फोफावलेली विषमता गांधीजींना अभिप्रेत नव्हती. आदर्श राष्ट्रासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने आपला थोडा वेळ, विवेक आणि निष्ठा राष्ट्रासाठी अर्पण केली पाहिजे असेही ते म्हणाले.
प्र-कुलगुरू डॉ. पी .एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिंताजनक
राजधानीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करताहेत, त्या आंदोलनाप्रती आपली उदासीनता सुद्धा चिंताजनक आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, हे आपण विसरतो आहोत. उद्या शेतकऱयानेही जर ते विसरायचे ठरवले तर आपल्यावर काय प्रसंग ओढवेल, याचा आपण विचार करायला हवा.