आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झाले आहे. कोटय़वधी माणसे कोरोना विषाणूने ग्रस्त असून लाखो लोक जगाच्या विविध भागात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. भारतीय लोकमानसाने एकेकाळी आपल्या परिसरातील निसर्ग आणि पर्यावरणाच्या सान्निध्याने जीवनपद्धती विकसित केली आणि आपले जगणे सुसहय़ केले होते परंतु आपण या जीवन पद्धतीकडे डोळसपणे पाहण्याऐवजी तिच्याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या देशाने गेल्या काही वर्षांपासून विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली असून ही झेप घेताना आपल्या देशातील भौगोलिक परिस्थिती, हवामान, सांस्कृतिक मूल्ये आणि जीवनपद्धती यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे बऱयाच अडीअडचणींना सामोरे जाताना आपली दमछाक होऊ लागलेली आहे. 2 ऑक्टोबर हा दिवस भारतभर महात्मा गांधीजी आणि लाल बहाद्दूर शास्त्री या दोन महापुरुषांची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी जी विचारधारा मानली आणि तिचा प्रसार व्हावा म्हणून जे प्रयत्न केले त्याची कास जर आम्ही धरली असती तर हा देश आजच्यापेक्षा अधिक समृद्ध आणि संपन्न झाला असता.
लाल बहाद्दूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा मंत्र आपणाला दिला होता. आपणाला तळहाती शिर घेऊन क्षणोक्षणी सुरक्षित जीवन देणारे आणि उदरभरण करण्यास अन्नधान्य पुरविणारे जवान आणि किसान यांच्या योगदानाकडे लक्ष देऊन त्यांच्या सशक्तीकरणाला आम्ही प्राधान्य दिले असते तर सुदृढ जवान आणि संपन्न किसान यांच्याद्वारे आपला देश आणखी सशक्त, समृद्ध झाला असता. महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला सत्याग्रह, स्वदेशी याद्वारे नवीन आयाम मिळवून दिला त्याचप्रमाणे मानवी समाजाचे जगणे सुखी व्हावे म्हणून साधी राहणी, उच्च विचार देण्याबरोबरच आपले आरोग्य निरोगी आणि आयुष्य समृद्ध व्हावे म्हणून नैसर्गिक चिकित्सेच्या सिद्धांताचा वारसा दिला. त्यांच्या या सिद्धांतावरती आम्ही जीवनात मार्गक्रमण केले तर आपले जगणे सुंदर आणि संतुष्ट होऊ शकते. गांधीजीनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टरशिप मिळविली. आफ्रिकेत जाऊन रंजलेल्या, गांजलेल्या भारतीयांसाठी न्यायालयीन लढा उभारला, त्यांच्यातला स्वाभिमान जागृत केला आणि टिळक युगाच्या अस्तानंतर भारतात येऊन त्यांनी सत्याग्रह आणि स्वराज्याच्या चळवळीद्वारे इथल्या जनमानसातले वीर अक्षौहिणीचे सामर्थ्य जागृत केले. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय राहण्याबरोबर महात्मा गांधीजींनी निसर्ग आणि पर्यावरणावर आधारित जीवन जगण्याची पद्धत विकसित करून मानवी जगणे सुंदर आणि समृद्ध केलेले आहे. निसर्गाकडे आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य असले तरी अमाप स्वार्थाची पूर्तता करणे असंभव असल्याची गांधीजींची धारणा होती.
त्यासाठी गांधीजींनी नैसर्गिक चिकित्सेद्वारे आपले जीवन अधिकाधिक सुंदर आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीने भर दिला होता. जी व्यक्ति नैसर्गिक चिकित्सेचा स्वीकार करेल तिला कधी कोणती उणीव भासणार नाही. स्वतःचे काम स्वतः करण्याने आत्मसन्मान वृद्धिंगत होतो. गरज नसलेले विषारी पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर फेकण्याचा तो प्रयत्न करतो आणि भविष्यातील रोगांची शिकार होण्यापासून सावधान होतो. जाणूनबुजून अथवा अज्ञानाने आम्ही निसर्गातल्या नियमांचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा रोग वाढतात. परिस्थितीनुसार नियमांचे पालन केल्याने संवर्धन होते, अशी गांधीजींची विचारधारा होती. आपले आरोग्य निरोगी आणि दीर्घायु होण्यासाठी निसर्ग आणि पर्यावरणीय मूल्यांचे पालन व्हावे म्हणून त्यांनी नैसर्गिक चिकित्सेशी निगडित दहा सिद्धांत स्वीकारण्यावर भर दिला होता. शाकाहार माणसास आरोग्यवर्धक आणि फायदेशीर असून सेंद्रिय खताद्वारे जमिनीत शेती करण्याने पिकविले जाणारे अन्न माणसासाठी पोषक आणि लाभदायक ठरते. आरोग्यासाठी आपण काय खातो हे महत्त्वपूर्ण नसून जेवणाचे प्रमाण कमी करणे आणि कमी खाणे महत्त्वाचे आहे. संतुलित खाणे गरजेचे आहे. न शिजविलेल्या अन्नाचे नैतिक मूल्य अतुलनीय असून असे जेवण शिजविलेल्या अन्नापेक्षा फायदेशीर असते. त्यासाठी आपल्या आहारात ताज्या पालेभाज्या, मोसमानुसार उपलब्ध स्थानिक फळांचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला होता. गांधीजीनी गाई म्हशीचे दूध प्राणीजन्य असल्याने पिण्याचे बंद केले होते परंतु जेव्हा अतिसाराने त्यांचे शरीर दुर्बल झाले तेव्हा डॉक्टर आणि कस्तुरबा यांच्या आग्रहाखातर त्यांनी बकरीचे दूध पिण्यास प्रारंभ केला. पालेभाज्या आणि स्थानिक मोसमी फळांचा आपल्या आहारात समावेश केला होता. विशुद्ध उपवास मन आणि आत्मा शुद्ध ठेवतो. आपले शरीर नियंत्रित राहते आणि आत्म्यास शांती लाभते. गांधीजी दररोज 8 मैल चालत असत आणि दिवसभरात तीनवेळा ते चालायचे. संध्याकाळी 5.30 नंतर एक तास आणि रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी अर्धा तास ते चालायचे. लांब पल्ला चालणे हा उत्तम व्यायाम असून गांधीजी जेव्हा इंग्लंडमध्ये होते तेव्हा चालण्याने ते निरोगी राहिले आणि त्यांना सुदृढ आणि सुंदर शरीर प्राप्त झाले होते.
काही प्रसंगी गरम पाण्याचा योग्य वापर प्रभावकारी ठरलेला आहे. पाय थंड पडत असले अथवा पायात वेदना होत असेल तर पायांना कमीत कमी पंधरा मिनिटे आंघोळ घालणे गरजेचे आहे. पायातले रक्ताभिसरण थांबले आणि पायातल्या पेशी आकुंचित होऊन, वेदना होत असतील तर बर्फाद्वारे पायांना मसाज केला तर तो फायदेशीर ठरतो. खेळती हवा असताना व्यायाम आणि शाकाहारी जेवणाद्वारे आपल्याला निरोगी आरोग्य लाभले, असे गांधीजीना वाटायचे. जलस्नान आणि सूर्यकिरणात सकाळच्या वेळेत राहणे आरोग्यवर्धक असते, नैसर्गिक चिकित्सा पद्धती आपले आरोग्य निरोगी आणि दीर्घायु होण्यास साहाय्यक असून शाकाहार, संतुलित अन्न सेवनाने आपले जगणे सुंदर आणि समृद्ध करतो, असा गांधीजींचा आशावाद होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी साध्य करणे त्यामुळेच महात्मा गांधीजींना साध्य झाले होते. त्याचे पालन आमच्यासाठी लाभदायक ठरू शकते.
राजेंद्र पां. केरकर