अमलीपदार्थांची विषवल्ली मुळापासून उखडून टाका, बेळगावला ‘उडता पंजाब’ होण्यापासून रोखा, कारवाई तीव्र करण्याची गरज
रमेश हिरेमठ /बेळगाव
बेळगाव पोलिसांनी गेल्या आठ-दहा दिवसांपासून अमलीपदार्थांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. याकाळात शहर व उपनगरात गांजा, पन्नी विकणाऱया 13 जणांना अटक झाली आहे. अद्याप अमलीपदार्थांविरुद्ध मोहीम सुरूच असली तरी छोटे झाले आता बडे मासे कधी पकडणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण बेळगावात तरुणाई मोठय़ा प्रमाणात अमलीपदार्थांच्या आहारी जाताना दिसते आहे.
पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी 25 फेब्रुवारी 2022 रोजी सुवर्ण विधानसौधमध्ये कर्नाटक विकास आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत गांजा, पन्नी आदी अमलीपदार्थ विक्रीबरोबरच बेळगावात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या मटका, जुगाराविरुद्ध कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित करून अधिकाऱयांना यासाठी आठ दिवसांची मुदत दिली होती.
डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी पोलीस आयुक्त पदाची सूत्रे घेतल्यानंतर मटका, जुगार व अमलीपदार्थ विकणाऱयांविरुद्ध कारवाई तीव्र करण्याची सूचना अधिकाऱयांना केली आहे. पोलीस आयुक्तांचा तगादा लक्षात घेऊन कनि÷ अधिकारीही कामाला लागले आहेत. गेल्या आठ-दहा दिवसात गांजा विकणाऱयांना अटक होत आहे. यावरून आताच गांजाविक्री सुरू आहे का? यापूर्वी बेळगावात अमलीपदार्थांची विक्री होत नव्हती का? होत होती, तर गुन्हेगारांना अटक का केली जात नव्हती? असे प्रश्न जनसामान्यातून विचारले जात आहेत.
2 मार्च रोजी उद्यमबाग पोलिसांनी तिघा जणांना अटक करून 528 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्याच्या दुसऱयाच दिवशी अबकारी अधिकाऱयांनी संगमेश्वरनगरजवळ एका तरुणाला अटक करून 820 ग्रॅम गांजा जप्त केला. 5 मार्च रोजी तीन ठिकाणी गांजा विकणाऱयांना अटक झाली आहे. कॅम्प पोलिसांनी एकाला अटक करून अर्धा किलो, उद्यमबाग पोलिसांनी दोघा जणांना अटक करून 253 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्याच दिवशी सीईएन विभागाने दोघा जणांना अटक करून 2 किलो 125 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
7 मार्च रोजी खडेबाजार पोलिसांनी पन्नी विकणाऱया दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून 48 ग्रॅम 410 मिली पन्नी जप्त केली आहे. 11 मार्च रोजी शहापूर पोलिसांनी दोघांना अटक करून 715 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात सात ठिकाणी कारवाई करून अबकारी व पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून 4 किलो 995 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. केवळ छोटी-मोठी कारवाई करून बेळगावातून गांजा हद्दपार होणार का? हा खरा प्रश्न आहे. एखादा नवा अधिकारी पोलीस दलात दाखल झाला. राजकीय नेत्यांनी झाडाझडती घेतली की सुरू होणारी कारवाई सातत्यपूर्ण का चालू ठेवली जात नाही? हा प्रश्न आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी तर आपल्या अधिकाऱयांना कडक शब्दात बजावल्यामुळे सध्या तरी अमलीपदार्थांविरुद्ध कारवाई तीव्र झाली असली तरी अनेक पोलीस स्थानकांच्या कायक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गांजा विक्री सुरू असूनही तेथील अधिकारी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी या व्यवहाराकडे कानाडोळा करताना दिसतात.
अमलीपदार्थांचा बाजार खुलेआम सुरू
अमलीपदार्थांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या बेळगावला अतिमहत्त्व आहे. यापूर्वी मोठय़ा प्रमाणात अफीम, मँडेक्स, मारिजुवाना, हशिश विक्रीमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. सध्या ड्रग्जडिलर आकाश देसाई व त्याचे साथीदार कारागृहात आहेत. तरी अमलीपदार्थांचा व्यवहार मात्र थांबलेला नाही. गांजा हे केवळ किरकोळ असून याहीपेक्षा मोठय़ा अमलीपदार्थांचा बाजार खुलेआम सुरू आहे. ज्यांना अफीम, चरस, हशीश सेवन करणे परवडत नाही, ते तरुण गांजाकडे वळतात. येथील रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक व काही शिक्षण संस्थांबाहेर गांजा व पन्नीच्या पुडय़ा विकणाऱयांची संख्या मोठी आहे. इतर ड्रग्जच्या तुलनेत गांजा स्वस्त आहे. त्यामुळे तरुणाईकडून गांजाला अधिक मागणी आहे. यापूर्वी बेळगावला मिरज, सांगली, सोलापूर, विजापूरमधून गांजा पुरवठा व्हायचा. आता महाराष्ट्राबरोबरच जिल्हय़ातील अथणी, रायबाग, रामदुर्ग, बैलहोंगलमधून मोठय़ा प्रमाणात गांजा बेळगाव शहरात येतो आहे. ड्रग्जमाफियांचे कंबरडे वेळीच मोडले नाही तर तरुणाईला बरबाद होण्यापासून रोखणे अशक्मय आहे.
गोव्यात नव्हे बेळगावात खप अधिक
एक काळ असा होता, की केवळ आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित साधू गांजा सेवन करीत होते. नंतरच्या काळात गुन्हेगारी कारवाईत गुंतलेले गांजाचे सेवन करूनच गुन्हे करू लागले. एकदा गांजाचे सेवन केले की अंगात बळ आणि धाडस वाढते, अशी गुन्हेगारांची समजूत आहे. त्यामुळेच चोऱया, घरफोडय़ा करणारे बहुतेक गुन्हेगार गुन्हय़ापूर्वी गांजाचे सेवन करतात. आता तर तरुण-तरुणीही गांजाच्या आहारी गेल्या आहेत. बेळगाव येथून गोव्याला मोठय़ा प्रमाणात अमलीपदार्थांचा पुरवठा होतो. गोव्यात येणारे विदेशी पर्यटक या टोळीचे ग्राहक होते. आता बेळगावलाच त्यांचे ग्राहक वाढल्यामुळे पुरवठाही सुरळीतपणे सुरू आहे. छोटय़ा विपेत्यांना पकडण्यापेक्षा मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या ड्रग्जरॅकेटच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे.









