नक्षलग्रस्त टापूमधून पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती : शहरासह गोवा राज्यात विक्री, व्यसनाविरुद्ध जनजागृती करण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. खासकरून कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात तर गांजाचा दम वाढला होता. बेळगावला नक्षलबाधित राज्यांमधून मोठय़ा प्रमाणात गांजा पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून हे नेटवर्क तोडण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले आहे.
महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेल्या बेळगावात गेल्या अनेक वर्षांपासून अमली पदार्थांची तस्करी अव्याहतपणे सुरू आहे. मँडेक्स आणि हशिश पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात जप्त केले होते. बेळगाव येथून ड्रग्ज गोव्याला पुरविला जातो. या व्यवसायावर अनेक तस्कर गब्बर झाले आहेत. मात्र, तरुणाईची पुरती वाट लागली असून खासकरून विद्यार्थ्यांना गिऱहाईक बनविण्याचे काम या तस्करांनी केले आहे.
बेळगावला अनेक शिक्षणसंस्था आहेत. त्यामुळे परराज्य व परदेशातूनही विद्यार्थी बेळगावला येतात. तस्करांसाठी हेच मोठे मार्केट ठरले आहे. हशिश, पन्नी, कॅटामाईनच्या गोळय़ांपेक्षाही सध्या गांजाची चलती आहे. बेळगावला गांजा पुरवठा करणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीच्या म्होरक्मयांपर्यंत तपास यंत्रणेला अद्याप पोहोचता येईल, अशी परिस्थिती आहे.
माहितीनुसार आंध्रप्रदेश व तेलंगणामधील नक्षलग्रस्त जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणात गांजा पुरवठा सुरू आहे. तर दुसरीकडून महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, सांगली, मिरजमधूनही बेळगावला गांजा येतो. अर्धा व एक किलोच्या पाकिटमधून गांजा पुरवठा केला जातो. तर दुसरा मार्ग आंध्रमधील अनंतपूर, बळ्ळारी, कोप्पळ, हुबळीपासून बेळगावला येतो.
अधूनमधून पोलीस यंत्रणेला चकविण्यासाठी नक्षलग्रस्त जिल्हय़ातून येणारा गांजा कोलार व चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ात साठविण्यात येतो. तेथून हुबळीमार्गे बेळगावला पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते. काही वेळा बेळगाव येथून गोव्याला गांजा जातो तर केरळ व मुंबईमधून थेट मंगळूरमार्गे गोव्याला गांजा पोहोचविण्याची यंत्रणा सक्रिय आहे.
अतिरेकी संघटनांच्या आर्थिक गरजा अमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीतून भागवल्या जातात. नक्षलग्रस्त भागातही हीच व्यवस्था असून जंगलात मोठय़ा प्रमाणात गांजा पिकवून त्याची विक्री केली जाते. तपास यंत्रणेला याविषयीची संपूर्ण माहिती असली तरी आजवर केवळ आणून विकणाऱयांनाच अटक झाली आहे. गांजा तस्करी करणाऱया किंगपिनपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले आहे.
गेल्या दीड वर्षात जप्त केलेला 1100 किलो गांजा पंधरा दिवसांपूर्वी नष्ट करण्यात आला. अमली पदार्थांची विक्री व तस्करी प्रकरणात जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्याची एक पद्धत आहे. जिल्हा पातळीवरील ड्रग डिस्पोजल कमिटीची परवानगी घेऊन ते नष्ट केले जाते. 11 जून रोजी बेळगाव पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात गेल्या दीड वर्षात 77 प्रकरणात जप्त केलेला 366 किलो गांजा गुंजेनहट्टी, ता. बेळगावजवळ नष्ट करण्यात आला.
26 जून रोजी जिल्हय़ात 129 प्रकरणात जप्त केलेला 786.67 किलो गांजा हारुगोप्पजवळील एका कारखान्यातील बॉयलरमध्ये घालून जाळण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्यासह वरि÷ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्याचे पूर्ण चित्रिकरण केले जाते.
पोलीस अधिकाऱयांच्या मते तरुणाईत नशेसाठी गांजाचा वापरण्याची सवय वाढली आहे. चोरी, वाटमारी, दरोडय़ाच्या गुन्हय़ात सहभागी असणारे गुन्हेगारही गांजाचे सेवन करतात. एखादा गुन्हा करायला जाण्याआधी गांजा सेवन करूनच मैदानात उतरतात. अनेक गुन्हेगारी प्रकरणावरून हे आढळून आले आहे. नशेत असताना गुन्हेगार वाट्टेल त्या थराला पोहोचतात, असा अधिकाऱयांचा अनुभव आहे.
बेळगाव जिल्हय़ातही अथणी, रायबाग, बैलहोंगल, रामदुर्ग तालुक्मयात गांजा पिकविला जातो. उसाच्या मळय़ात गांजा पिकवला जातो. स्थानिक पोलिसांना खबर मिळाल्यानंतर संबंधितांवर कारवाईही होते. यापेक्षाही परराज्यातून संघटित जाळय़ाच्या माध्यमातून बेळगावला येणारा गांजा थोपविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
आमची मोहीम सुरूच : लक्ष्मण निंबरगी

अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध पोलिसांची मोहीम सुरूच असते. जिल्हय़ातील सर्व अधिकाऱयांना यासंबंधी सूचना केल्या आहेत. संघटित जाळय़ातून बेळगावसह जिल्हय़ातील विविध भागात पोहोचणारा गांजा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात आम्ही बऱयाच अंशी यशस्वी असलो तरी आंतरराज्य तस्करांचे आव्हान संपुष्टात आलेले नाही, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. स्थानिक पातळीवर गांजा विक्री करणाऱयांवर तर कारवाई होतेच, शिवाय राज्य आणि आंतरराज्य पातळीवरही कारवाईचे प्रयत्न सुरू आहेत. अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱयांवर कारवाई करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहेच, मात्र सामाजिक संघटनांनी तरुणाईमध्ये फैलावणाऱया व्यसनाधिनतेविरुद्ध प्रबोधन करणे गरजेचे आहे.









