नवी दिल्ली
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार चालू 2021-22 च्या रब्बी व्यापारी सत्रामध्ये आतापर्यंत गव्हाची खरेदी ही 70 टक्क्यांपेक्षा अधिकने वाढून 292.52 लाख टनाच्या घरात पोहोचली आहे. या खरेदीदरम्यान जवळपास 28.80 लाख शेतकऱयांना लाभ मिळाला असल्याचेही म्हटले आहे. सरकारी उपक्रम भारतीय खाद्य निगम (एफसीआय) आणि राज्य एमएसपीअंतर्गत खरेदीचे अभियान चालविण्यात आले आहे.
चालू वर्षात केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱयांना एमएसपीचे पेमेंट थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची व्यवस्था करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.
खाद्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2 मे 2021 पर्यंत 292.52 लाख टनापेक्षा अधिकच्या खरेदीसोबत पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, चंदीगढ, मध्यप्रदेश, राजस्थान आणि अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये गव्हाची खरेदी तेजीने करण्यात आली आहे.









