प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक टेक्निकल बोर्डच्या नवीन अभ्यासक्रमानुसार पॉलिटेक्निकच्या पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी येथील एम. वाय. गंगूर फाउंडेशनच्या वतीने योग प्रशिक्षण अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नवीन अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एम. वाय. गंगूर फाऊंडेशनचे अध्यक्ष व योगगुरु रमेश गंगूर उपस्थित होते. व्यासपीठावर गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य वाय. एन. दोड्डमनी, इलेक्ट्रॉनिक ऍण्ड कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख गिरीजा बिरादार, एम. के. मंडू उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक ऍण्ड कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख गिरीजा बिरादार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर पाहुण्यांचे स्वागत करून त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागतही करण्यात आले.
यावेळी बोलताना रमेश गंगूर म्हणाले, योग-ध्यानधारणा ही काळाची गरज असून योगामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, आकलनशक्ती, स्मरणशक्ती प्रचंड प्रमाणात वाढते.तसेच विद्यार्थ्यांत आत्मविश्वास व सकारात्मकता यांची वृद्धी होते. तसेच एक सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्राचार्य दोड्डमनी म्हणाले, योगाला पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात सामावून घेतल्याने विद्यार्थ्यांना याचा खूपच फायदा होणार असून योगबरोबर व्यक्तिमत्त्व विकास व अनेक उपयुक्त कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सूत्रसंचालन महेश टुबाकी यांनी केले. आभार एम. के. मंडू यांनी मानले. याप्रसंगी प्रथम वर्षाचे विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.









