राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी येथे नदी काठाजवळील छ. शाहू महाराज यांच्या शेरी नावाच्या शेतात माकडे हुसकावून लावत असताना अचानकपणे पाठीमागून आलेल्या गव्याने धडक दिल्याने संतोष रामचंद्र चांदम (वय वर्ष 44) हा शेतमजूर गंभीर जखमी झाला असून या गव्याच्या हल्ल्यात त्याच्या पाठीला व पायाला दुखापत झाली आहे. यावेळी शेतात असणाऱ्या लोकांनी गव्याला हुसकावून लावले.
संतोष यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तातडीने वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. जखमींची विचारपूस करून नुकसानभरपाई देण्यात येईल असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. तात्पुरते उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. वारंवार होत असलेल्या गव्याच्या हल्लाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तरी वन विभागाने गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.









