नंदगड/वार्ताहर
गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने पडणाऱया पावसामुळे भातपीक पाण्याखाली गेले होते. त्यातच आता गवे व रान डुक्करांच्या कळपाकडून भात पिकात घुसून, खाऊन, तुडवून मोठय़ा प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्रभर असोगा येथील पुंडलिक नागो मिसाळ व अन्य शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात जंगली जनावरांनी नुकसान केले आहे.
असोगा व परिसरात गवे, रानडुक्कर, यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. दिवसा जंगलात व रात्री शेतात असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. त्यामुळे आता शेती करणे कठीण होऊन बसले आहे. सदर जंगली जनावरांचा बंदोबस्त करावा म्हणून शेतकऱयांनी शासनदरबारी निवेदने दिली आहेत. प्रसंगी आंदोलन केले आहे. पण त्याची कुणीच दखल घेत नाही. त्यामुळेच आता शेतकऱयांना नुकसानभरपाईला सामोरे जावे लागत आहे. सदर शेतकऱयांचे भात पिकाचे नुकसान झाल्याने त्यांच्या वर्षभराची गुजरान गेली आहे. शासनाने संबंधित शेतकऱयांना त्यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी व पंचनामा करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे..









