कोल्हापूर/प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात वारंवार गवा रेड्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान आज सकाळपासून गवा रेड्याने जामदार क्लब जवळ गायरान परिसरात ठाण मांडल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या गव्याला नैसर्गिक आदिवासात परत पाठवण्यासाठी वनविभाग, पोलीस प्रशासन आणि प्राणी मित्र संघटना कामाला लागली आहे.
आज पहाटेच्या सुमारास पंचगंगा नदी घाटावर गवा रेड्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान आज सकाळपासून याच परिसरात गव्या रेड्याने ठाण मांडल्याने वन विभाग सतर्क झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा गवारेडा नागरी वस्तीत शिरू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच नागरिकांची गर्दी होऊन गावा रेड्याच्या जीवितास धोका पोहोचू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गंगावेशकडून येणारे रस्ते पोलीस प्रशासनाने बंद केले आहेत. तसेच शिवाजी पुलावरून येणारी वाहतूक गायकवाड वाड्या जवळ बंद केली आहे. दरम्यान बघ्यांची गर्दी झाली असून वन विभाग, जिल्हा पोलीस प्रशासन या ठिकाणी तळ ठोकून आहे. गव्या रेड्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास येत आहे.
कोणत्याही परिस्थितीत गवारेडा नागरी वस्तीत येणार नाही याची काळजी वन विभाग घेत आहे. तसेच त्याच्या जीवितास धोका पोहोचणार नाही याची खबरदारी देखील वन विभाग घेत आहे. कोणत्याही परिस्थितीत गावा रेड्याला त्याचा नैसर्गिक आदिवासात सोडण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे. त्यासाठी संपूर्ण वनविभागाचे कर्मचारी तैनात केले आहेत.-रमेश कांबळे, आर. एफ. ओ. करवीर