मालवण-कसाल मार्गावर दुचाकीला दिली धडक
वार्ताहर / कट्टा:
मालवण-कसाल मार्गावर कुणकवळे बागवाडी येथे बुधवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास मालवणहून कसालच्या दिशेने दुचाकीने जाणाऱया दाम्पत्यावर गवारेडय़ाने हल्ला केला. या अपघातात हे दाम्पत्य रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.
मालवण कुंभारमाठ-गवळीवाडा येथील अक्षय सुधाकर लंगोटे व त्यांची पत्नी मेघा हे दोघेही बुधवारी सकाळी कामानिमित्त दुचाकीने (एम. एच. 07 जे 8601) कुंभारमाठहून कसालच्या दिशेने जात होते. कुणकवळे बागवाडी येथे रस्त्यावर अचानक भलामोठा गवारेडा दुचाकीसमोर आला. अन्य एक दुचाकीस्वार कसाबसा मार्ग काढत निघून गेला. मात्र, मागाहून येणाऱया लंगोटे यांच्या दुचाकीवर या गवारेडय़ाने हल्ला केला. यात अक्षय आणि मेघा हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. घटना घडल्यानंतर काही वेळ गवारेडा त्याच ठिकाणी होता. मार्गावरून जाणाऱया अन्य वाहन चालक, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यांनी 108 रुग्णवाहिका बोलावून गंभीर जखमी झालेल्या त्या दाम्पत्याला जिल्हा रुग्णालयात हलविले.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गवारेडय़ांचा कळप या परिसरात सातत्याने दिसून येत आहे. गवारेडय़ाच्या या हल्ल्याने त्याला पुष्टी मिळाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावरून जाणारे वाहन चालक व स्थानिक ग्रामस्थ यांच्या कधीही जीवावर बेतू शकते. त्यामुळे वनखात्याने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन गवारेडय़ांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.









