म्हासुर्ली / वार्ताहर
गवशी (ता. राधानगरी) येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून एका तरुणास काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. डोक्यात वर्मी मार बसल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पोलिसात उशीरापर्यत गुन्हा नोंद झाला नव्हता.
अधिक माहिती अशी की दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली होती.त्या मिरवणुकीचे चित्रीकरण पाहण्यावरून दोन दिवसापूर्वी दोन तरुणांमध्ये किरकोळ हाणामारी झाली होती. त्यावेळी सदर वादावर गावातील ज्येष्ठांनी तोडगा काढत पडदा टाकला होता.
मात्र रविवारी सकाळी जखमी झालेला तरुण बाहेर गावी जायच्या तयारीत असताना विसरलेले पैशाचे पाकीट घेण्यासाठी मोटर सायकल वरून घरी येत होता. त्याच वेळी पाळत ठेवून असणाऱ्या दुसऱ्या तरुणाने काठीने सदर तरुणावर जोरदार हल्ला केली. त्यामुळे डोक्यात वर्मी घाव बसल्याने संबंधित तरुण जागेवरच बेशुद्ध पडला.
दरम्यान बेशुद्ध तरुणास नातेवाईकांनी त्यास तत्काळ कोल्हापूर येथील सीपीआर येथे दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर स्वरूपाची मारहाण झाल्याने त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसानीं गावाला भेटून पाहणी केली आहे.