एलऍण्डटी कंपनी कारभाराचा निषेध : गणपत गल्लीतील व्हॉल्व्ह दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
खडेबाजार-गणपत गल्ली कॉर्नरवर असलेल्या पाणीपुरवठा व्हॉल्व्हच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात पाणी गळती लागली आहे. पाणीपुरवठावेळी गळती लागलेले पाणी रस्त्यावरून वाहत कडोलकर गल्लीच्या कॉर्नरपर्यंत पोहोचत आहे. तरीदेखील याकडे एलऍण्डटी कंपनीने दुर्लक्ष केले आहे. कंपनीच्या कारभाराचा निषेध गणपत गल्लीतील व्यापाऱयांनी रविवारी केला.
शहर आणि उपनगरातील जलवाहिन्यांना गळत्या लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच व्हॉल्व्हला लागलेल्या गळतीच्या माध्यमातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. प्रत्येक गल्लीच्या कॉर्नरवर व्हॉल्व्ह असून, त्यातून पाणी जात असते. विशेषतः खडेबाजार, गणपत गल्ली कॉर्नरजवळ दोन व्हॉल्व्ह बसविले आहेत. दोन्ही व्हॉल्व्हला गळती लागल्याने सतत पाणी वाया जात आहे. रविवारी सकाळी पाणीपुरवठा करतेवेळी व्हॉल्व्हच्या गळतीद्वारे पाणी गल्लीतील रस्त्यावरून कडोलकर गल्ली कॉर्नरपर्यंत पोहोचले. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरून वाहणारे पाणी पादचाऱयांच्या तसेच फेरीवाल्यांच्या अंगावर उडत होते. काही ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी पाणी गेल्याने बैठय़ा व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
व्हॉल्व्हची दुरुस्तीकडे कंपनीचा कानाडोळा
सातत्याने तक्रार करूनही व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्याकडे एलऍण्डटी कंपनीने कानाडोळा केला आहे. त्यामुळे कंपनीच्या कारभाराचा निषेध गणपत गल्लीतील व्यावसायिकांनी केला.
व्हॉल्व्हची दुरुस्ती न केल्यास मोर्चाचा इशारा
रविवारी सकाळी गणपत गल्लीतील रस्त्यावर येऊन व्यावसायिकांनी कंपनीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या व व्हॉल्व्हच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली. व्हॉल्व्हची दुरुस्ती न केल्यास मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.









