कोरोनाच्या दुसऱया लाटेत जागतिक तज्ञांच्या महत्वपूर्ण सूचना, दुर्लक्ष केल्यास प्रकृतीवर गंभीर परिणाम शक्य
युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेत कोरोनाच्या दुसऱया लाटेने हाहाकार माजविला आहे. भारत व आशियातही दुसरी लाट उंबरठय़ावर असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. अशा स्थितीत सर्वांनाच अधिकतर दक्षता बाळगणे आवश्यक आहे विशेषतः गर्भवती महिलांवर स्वतःची आणि गर्भाची प्रकृती सांभाळण्याचे दुहेरी उत्तरदायित्व असल्याने त्यांनी विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.
नव्या संशोधनानुसार कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग हवेतून, अर्थात श्वासोच्छ्वासातून होतो ही बाब उघड झाली आहे. कोणताही पृष्ठभाग, जमीन, खाण्याच्या वस्तू तसेच भांडी इत्यादी स्वयंपाकघरातील साधने यांच्यापेक्षा हवेतूनच हा विषाणू एका माणसाकडून दुसऱया माणसात अधिक वेगाने पोहचतो, असे पाहणीत आढळून आले आहे. तसेच तो मोकळय़ा वातावरणापेक्षा बंदिस्त वातावरणात जास्त पसरतो असेही हे संशोधन सांगते.
बंदिस्त वातावरणात अधिक प्रसार
गर्भवती महिलांना अधिक काळ आपल्या घरातच घालवावा लागतो. त्यामुळे घरात कोणाला लक्षणे न दिसणाऱया कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर अशा व्यक्तीच्या जवळ वावर असल्यास गर्भवती महिलांनाही याची लागण झपाटय़ाने होऊ शकते, असे दिसून आले आहे. त्यामुळे घरात पुरेशी हवा खेळती ठेवण्याची दक्षता घ्यावी. खिडक्या आणि दरवाजे शक्यतर उघडे ठेवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. परिस्थितीनुसार प्रत्येकाने शक्य ती सर्व काळजी घ्यावी. वारंवार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गर्भाला लागणीची शक्यता कमी
संशोधनातून असेही दिसून येते की गर्भवती मातेला कोरोना झाला तरी त्याची लागण गर्भाला होण्याची शक्यता अत्यल्प असते. हा श्वसनातून पसरणारा विषाणू असल्याने त्याचा गर्भाला संसर्ग होण्याची शक्यता कमी असली तरी गर्भवती महिला आजारी असल्यास तिच्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम गर्भावर होऊ शकतो. तसेच आजार बरा करण्यासाठी जी औषधे दिली जातात त्यांचा परिणामही गर्भावर होणे अशक्य नाही असे सांगण्यात येते.
त्यामुळे गर्भवती महिलेना स्वतः कोणत्याही आजारापासून दूर ठेवणे आवश्यक असते असे तज्ञांचे मत आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्भवती महिलांसाठी पुढील उपाय अनिवार्य
- समतोल आहार : आहारात वजन अगर चरबी वाढविणारे अन्नपदार्थ कमी असावेत. तर पोषणद्रव्ये अधिक असणारे पदार्थ जास्त असावेत. अतिखाणे किंवा कमी खाणे टाळावे. प्रथिने, जीवनसत्वे यांचे पुरेसे प्रमाण असावे. तसेच पाणी आणि क्षार पोटात जाणेही आवश्यक आहे. शक्यतो स्वतःच्या मताप्रमाणे न जाता आहार तज्ञांच्या सल्ल्यानेच खाण्याच्या वेळा आणि पदार्थ ठरवावेत.
- कोरोनाचे ज्ञान आवश्यक : कोरोनाचा संसर्ग कसा होतो याचे शास्त्रीय ज्ञान प्रत्येक गर्भवती महिलेला करून देणे आवश्यक आहे. यासाठी कुटुंबियांनी किंवा सामाजिक संस्थांनी पुढे यावे असे आवाहन जागतिक तज्ञांनी केले आहे. विशेषतः ज्या देशांमध्ये साक्षरता किंवा शिक्षणाचे प्रमाण कमी आहे तेथे या प्रबोधनाचे आवाहन मोठे आहे. विशेष यंत्रणेची आवश्यकता आहे.
- लागणपूर्व दक्षता आवश्यक : कोरोना संसर्गाबद्दल गैरसमजुतींना थारा देता कामा नये. लागण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा ती होऊच नये यासाठी योग्य दक्षता घेतल्यास पुढील सर्व धोके टाळता येतात. आरोग्य विषयक साध्या नियमांचे पालन, अर्थात हात जंतुमुक्त ठेवणे, हातांचा चेहरा, डोळे, नाक, ओठ इत्यादींना स्पर्ष होऊ न देणे, घरात व खोलीत खेळती हवा ठेवणे आणि घरातल्याही माणसांचा थेट संपर्क शक्य तो टाळणे हे उपाय करावेत.
- पुरेशी झोप आवश्यक : गर्भवती महिलांना नेहमीच पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातोच. तथापि या कोरोना काळात या सल्ल्याकडे विशेष गांभीर्याने पाहणे आवश्यक ठरते. पुरेशी झोप न घेतल्यास शरीरावर अधिक ताण पडून शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचे प्रमाण वाढते. ही स्थिती टाळण्यासाठी अतिरिक्त कामे टाळून विश्रांतीवर भर द्यावा, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
प्रतिकारशक्तीत घट
गर्भार अवस्थेत महिलांची रोगप्रतिकारशक्ती काही प्रमाणात कमी झालेली असते असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे अशा महिलांना कोरोनाची लागणही अधिक प्रमाणात होऊ शकते. परिणामी, त्यांनी संसर्ग टाळण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून नये, असे सांगण्यात येते.









