लंडनमध्ये चकीत करणारे प्रकरण : रोगांशी लढण्याच्या क्षमतेवर होणार परिणाम
वृत्तसंस्था / लंडन
गर्भनाळेत पहिल्यांदाच मायक्रोप्लास्टिकचे अस्तित्व आढळून आले आहे. मायक्रोप्लास्टिकचे कण भ्रूणाच्या विकासाला प्रभावित करू शकतात, असे संशोधकांचे मानणे आहे. नवजातांच्या रोगप्रतिकारकक्षमतेवरही प्रतिकूल प्रभाव टाकू शकतात आणि यामुळे भविष्यात रोगांशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते.
मायक्रोप्लास्टिकच्या या कणांमध्ये पॅलेडियम, क्रोमियम, कॅडमियम यासारखे विषारी धातू आहेत. परंतु मायक्रोप्लास्टिक किती प्रमाणात प्रतिकूल प्रभाव पाडणार हे अद्याप स्पष्ट नाही. संबंधित संशोधन रोमच्या फेटबेनेफ्राटेली हॉस्पिटल आणि पोलेटेक्निका डेल मार्श विद्यापीठाने केले आहे. मायक्रोप्लास्टिकचे कण 4 तंदुरुस्त महिलांच्या गर्भनाळेत आढळून आले आहेत. हे कण भ्रूणाचा विकास होणाऱया मेम्बेनमध्येही दिसून आले आहेत.
रंग, वेष्टन, कॉस्मेटिक
वैज्ञानिकांनुसार गर्भनाळेत कित्येक डझनांहून अधिक प्लास्टिकचे कण मिळाले आहेत. परंतु यातील केवळ 4 टक्क्यांची तपासणी करता आली आहे. हे कण लाल, निळे, नारिंगी आणि गुलाबी रंगातील होते. ते रंग, वेष्टन, कॉस्मेटिक आणि वैयक्तिक वापराच्या उत्पादनांद्वारे महिलांमध्ये पोहोचले होते.
अत्यंत सुक्ष्म
मायक्रोप्लास्टिकच्या कणांचा आकार 10 मायक्रॉन होता, हे अत्यंत सुक्ष्म असल्याने रक्तात मिसळून पूर्ण शरीरात कुठेही पोहोचू शकतात. हेच कण मुलांमध्ये पोहोचून त्यांना नुकसान होऊ शकते. भ्रूणाच्या विकासासाठी गर्भनाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तेथे कुठलीही घातक गोष्ट पोहोचणे योग्य नसल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.









