प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळी निमित्त मागील चार दिवसांपासून खरेदीसाठी बेळगाव बाजारात तुफानी गर्दी होत आहे. यामुळे वारंवार वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. फेरीवाले तसेच काही विपेत्यांनी रस्त्यावर साहित्य विक्रीचे स्टॉल लावल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रविवारी सकाळी पोलीसांकडून फेरीवाल्यांवर कारवाई करून नियंत्रण रेषेच्या आत स्टॉल लावण्यास सांगितले. यामुळे गर्दी नियंत्रणास मदत होणार आहे.
शहरातील मारूती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड या परिसरात खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली जात होती. बेळगाव सोबतच चंदगड व गोवा या भागातून खरेदीसाठी ग्राहक बेळगावमध्ये दाखल होत होते. खरेदीसाठी एकाच वेळी गर्दी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. त्यातच गणपतगल्ली येथे रस्त्यावर साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्याचा प्रकार होत आहे. या स्टॉलमुळे गर्दी नियंत्रणात आणणे कठिण होत आहे. तसेच रस्त्याच्या मध्ये फेरीवाले हातगाडय़ा लावून फळांची विक्री करीत असल्यामुळे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सकाळपासूनच बाजारात खरेदीसाठी गर्दी होती. तसेच सोमवारी दिवाळी पाडवा असल्यामुळे गर्दीत वाढ होणार आहे. यासाठी नियंत्रण रेषेच्यापुढे स्टॉल लावणाऱयांवर रविवारी पोलीसांनी कारवाई केली. फेरीवाल्यांना गणपतगल्ली मध्ये फिरण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु दुपारनंतर फेरीवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान बसविल्याचे दिसत होते.









