मुंबई/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाह होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्ष आणि संघटनांना कळकळीची विनंती केली आहे. दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नसून तज्ज्ञांनी ऑक्टोंबीरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सणाच्या काळात नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच “मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम नियमांत राहून साजरे करू शकता. मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या.”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे.
“राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे आहेत. उत्सव नंतरही साजरे करू. तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
राज्यात काहीजण “हे उघडा ते उघडा’ च्या मागण्या करत आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण केले पाहिजे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की साजरे करता येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाच्या नियमांचे पालन करायला हवे. गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.