प्रतिनिधी / कोल्हापूर
गरोदर मातेसाठी कोरोना लस सुरक्षित असून सर्व गरोदर मातांनी लसीकरण करुन घ्यावे. गरोदर माता व स्तनदा मातांसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन्हीही लसी सुरक्षित असून गरोदरपणातील कोरोनाचा संसर्ग आजार व त्याचे दुष्परिणाम टाळावयाचे असतील तर कोविड लसीचे दोन्ही डोस लवकरात लवकर घेणे आवश्यक असल्याचे सिद्ध झाले आहे. गरोदरपणातील कोणत्याही कालावधीत (पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत ) ही लस घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हयातील प्रसिध्द प्रसुती व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सतिश पत्की यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यात गरोदर मातांना कोविड लसीकरण सुरु असून गरोदर मातांचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रसुती व स्त्राrरोग तज्ञांसाठी कोविड लसीकरण कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी आरोग्य व बांधकाम सभापती वंदना जाधव, जि.प.सदस्य हंबीरराव पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ. सुप्रिया देशमुख, स्त्राrरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ.निरुपमा सखदेव, कोल्हापूर मेडिकल असो.च्या उपाध्यक्षा डॉ. गिता पालाई, पंचगंगा हॉस्पिटलच्या डॉ. विद्या काळे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई आदी उपस्थित होते.
गरोदरपणात कोविडचे लसीकरण गरोदर मातांसाठी सुरक्षित असल्याचे केंद्रीय लसीकरण तज्ञ सल्लागार समितीचा अभिप्राय आहे. त्यामुळे गरोदरपणात कोविड झाल्याने त्याचे गरोदर माता व अर्भक यांच्यावर होणारे दुष्पपरिणाम पाहता गरोदरपणात कोविडची लस घेणे जास्त सुरक्षित असल्याचे मत कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले. गरोदरपणात कोविड आजार झाल्यास गरोदर मातेची प्रकृती गंभीर व अतिगंभीर होण्याची शक्यता जास्त आहे. मातेकडून बाळाला होणारा रक्तपुरवठा कमी होवून बाळ कमी दिवसाचे, कमी वजनाचे जन्माला येणे, जंतू बाधा होणे तसेच उपजत मृत्यु, अर्भक मृत्यु अशा प्रकारच्या गुंतागुंती होण्याची शक्यता आहे. गरोदर मातांसाठी कोविशिल्ड ,कोव्हॅक्सीन व स्पुटनीक या सर्व प्रकारच्या कोविड लसी गरोदर मातांसाठी सुरक्षित आहेत. गरोदरपणाच्या कोणत्याही कालावधीत लसीकरण करुन घेणे सुरक्षित असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
स्त्रीरोग संघटनेच्या स्त्राrरोगतज्ञ संघटना कोल्हापूर (फॉक्सी) अध्यक्ष डॉ निरुपमा सखदेव यांनी कोविड लसीकरणासाठी सर्व गरोदर मातांना समुपदेशन करुन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हयातील सर्व प्रसुती व स्त्री रोग तज्ञांना केले. तसेच जिल्हयातील सर्व प्रसुती व स्त्राr रोग तज्ञांनी आपल्या भागातील गरोदर महिलांचे लसीकरण करुन घेण्यासाठी त्यांची भुमिका महत्वाची असून, लसीकरण पुर्ण होण्यासाठी जिल्हयातील आरोग्य व्यवस्था व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य व बांधकाम सभापती वंदना जाधव व हंबीरराव पाटील यांनी केले. यावेळी गरोदर मातांचे मोठया प्रमाणात लसीकरण होण्यासाठी खाजगी व शासकिय स्तरावरुन एकत्रित प्रयत्न करण्याचे निश्चित झाले. कार्यशाळेची प्रस्तावना व आभार जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.फारुक देसाई यांनी मानले.









