अंबाबाई भक्त मंडळाची देवस्थान समितीकडे फेर मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातील मंदिरांच्या सुरक्षेबाबत अधिक लक्ष दिले होते. परकीयांच्या आक्रमण परतवून लावताना हजारो मावळ्यांनी प्राणाची आहुती दिली. त्यामुळे तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिरात शिवजयंती साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील गरूड मंडपाच्या चौथऱ्यावर शिवप्रतिमेचे पुजन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करावे, या फेर मागणीचे निवेदन अंबाबाई भक्त मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे यांनी देवस्थान समितीला दिले.
निवेदनात म्हंटले आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंबाबाबाई मंदिरातील गरूड मंडपातील चौथऱ्यावर शिवप्रतिमेचे पूजन करावे, अशी मागणी देवस्थान समितीकडे अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. देवस्थान समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या मागणीसंदर्भात पत्र दिले असता, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गरूड मंडपाच्या चौथऱ्यावर शिवजयंती साजरी न करता पारंपारिक पध्दतीने कार्यालयातच साजरी करावी, असे पत्र देण्यात आले आहे. एका सार्वजनिक मंडळास दरवर्षी गरूड मंडपाच्या चौथऱ्यावर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. मग शिवजयंती का साजरी होवू शकत नाही, याची खंत अंबाबाई भक्त मंडळाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंबाबाई मंदिरातील गरूड मंडपाच्या चौथऱ्यावर शिवप्रतिमेचे पुजन करावे, अशा फेरमागणीचे निवेदन देवस्थान समितीला देण्यात आले आहे.