पैलवान हा गरीबाच्या घरातच तयार होतो. शेतकरी, कामगाराच्या घरातील मुले पैलवानकी करतात. श्रीमंताच्या घरातील नाही. त्यामुळे या पैलवानांना लागणाऱ्या खुराकाचा खर्च करणे परवडत नाही. हे ध्यानात घेऊन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने स्थापनेपासून शासनाकडे मल्लांना मानधन मिळण्यासाठी पाठपुरावा केला. आज बऱ्यापैकी मानधन मिळत आहे. मात्र आजच्या महागाईत तेही कमी पडते. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरीतील मल्लांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे, असे कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते यांनी सांगितले.
मोहिते म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई, मामासाहेब मोहोळ, हिंदकेसरी मारूती माने, गणपतराव आंदळकर यांनी कुस्तीगीर परिषदेचे नेतृत्व केले होते. लोकनेत्यांनी 1953 साली कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. प्रत्येक जिल्हय़ातून येणाऱ्या मल्लांना या स्पर्धेच्या माध्यमातून किमान दुधाइतके तरी मानधन मिळावे, यासाठी प्रत्येकी 30 रूपयांचे मानधन सुरू करण्यात आले. त्यावेळी रूपयाला 1 लिटर दूध मिळत होते. नंतर या मानधनात वाढ होत गेली. नंतरच्या काळात मल्लांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी परिषदेचे नेतृत्व करावे, अशी विनंती आम्ही शरद पवार यांना केली होती. त्यानुसार शरद पवार परिषदेचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून परिषदेच्या मागण्या मान्य होण्यास गती आली आहे. महाराष्ट्र केसरीतील मल्लांना मिळणारे मानधन आजच्या महागाईत कमी पडते. ते वाढवण्यासाठी शरद पवारांच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे प्रयत्न करणार आहोत. साताऱ्याच्या कुस्तीला ऐतिहासिक परंपरा आहे. खाशाबा जाधव यांनी 1952 साली देशाला कुस्तीचे ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले. श्रीरंगआप्पा जाधव यांनीही ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. मारूती वडार, शामराव मुळीक या पैलवानांनीही जिल्हय़ाचा नावलौकिक वाढवला. या जिल्हय़ात स्पर्धा होत असल्याने त्यास महत्व आहे. कुस्ती खेडय़ापाडय़ात पोहोचली पाहिजे, यासाठी परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. साताऱ्यात 1963 साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली होती, त्यावेळी मल्ल म्हणून मीही भाग घेतला होता. आज पुन्हा या स्पर्धा साताऱ्यात होत आहेत.