महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो व सहकाऱयांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक
प्रतिनिधी / मडगाव
प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो आणि त्यांच्या सहकाऱयांनी सध्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या कार्यपद्धतीवर नजर ठेवण्याबरोबर गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचा उपक्रम चालविला असून त्यामुळे ही महिला समिती कौतुकास पात्र ठरली आहे.
सुरुवातीच्या काळात फळभाज्या व किराणामालाचा तुटवडा जाणवला असता काही गरजूंच्या घरी प्रतिमा कुतिन्हो व महिला काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱयांनी जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या. सासष्टीतील नावेली, बाणावली, बोर्डा व अन्य ठिकाणी खासकरून ज्येष्ठ नागरिकांना सदर जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या.
भटकी कुत्री-गुरांना खाऊ
मुक्या प्राण्यांनाही खाऊ मिळावा यासाठी महिला काँग्रेसच्या सदस्यांनी पुढाकार घेतला असून माडेल येथील घाऊक मासळीबाजार व अन्य काही ठिकाणी असलेली भटकी कुत्रे व गुरांच्या खाद्यान्नाची प्रतिमा कुतिन्हो व त्यांच्या सहकाऱयांनी सोय केली. याखेरीज सध्या रस्ते व नाक्यानाक्यांवर पहारा ठेवणाऱया पोलिसांच्या कार्याची त्यांनी दखल घेतली आहे. हॉटेल व उपाहारगृहे बंद असल्याने अशा काही नाक्यांवरील पोलिसांसाठी चहाची सोय करून महिला काँग्रेसने माणुसकीची झलक दाखविली आहे.
अशाप्रसंगी माणुसकी दाखवून सर्वांनी सेवा करायला हवी. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक तक्रारींमुळे तसेच रांगेत उभे राहता येत नसल्याने खूप अडचणी भेडसावतात. सरकारने त्यांना जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा द्यायला हवी. तरच लॉकडाऊन यशस्वी होऊ शकेल, असे प्रतिमा कुतिन्हो यांनी म्हटले आहे. सरकारला जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी प्रभावी पद्धत राबविण्यात अपयश आले आहे. पंच, नगरसेवक, आमदारांना पासेस देण्यात आले असून ते आपल्या समर्थकांना प्राधान्य देत असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.