प्रतिनिधी/ मंडणगड
दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी तालुक्यातील म्हाप्रळ पोलीस चेकपोस्टनजीकच्या गावखडी नदीवरील गदा पूल येथे गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
अविनाश शिगवण (28, दीप्तलवण) असे या तरूणाचे नाव आहे. यासंदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दीप्तलवण येथील ग्रामस्थ गणपती विसर्जनासाठी प्रतिवर्षाप्रमाणे गदा पूल याठिकाणी जमा झाले होते. यावेळी पाण्याचा प्रवाह गतीशील होता. काही तरुणही नदीत उतरुन पोहत असताना त्यातील अविनाश हा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकरवण येथील ग्रामस्थ रामदास पोस्टुरे यांनी त्यास वाचवण्यासाठी पाण्यात सुर मारुन अविनाश यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्यास गती असल्याने अविनाश पाण्यात गायब झाला.
त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने घटनास्थळी शोध मोहीम राबवली. मात्र त्यालाही अपयश आले. तब्बल 18 तासांनंतर घटनास्थळापासून काही अंतरावर नदीपात्रात अविनाशचा मृतदेह सोमवारी दुपारी 12 चा सुमारास आढळला. यासंदर्भातील पोलीस पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम दिवसभर सुरु होते.









