शहरात 5 तास वीजपुरवठा खंडित
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका गणेश विसर्जनादिवशीही बसला. रविवारी शहरातील मध्यवर्ती भागात 5 तास वीजपुरवठा खंडित झाला होता. विसर्जनासाठी तयारी करणाऱया भाविकांची विजेअभावी गैरसोय झाली. फोन करूनही तक्रार निवारण केंद्रामधून समर्पक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.
शहरातील नार्वेकर गल्ली, रिसालदार गल्ली, गवळी गल्ली, गणाचारी गल्ली व खडेबाजारच्या काही परिसरात रविवारी सकाळी 10 च्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. गणेशमूर्तींच्या विसर्जनाची तयारी जोमात सुरू होती. परंतु वीजपुरवठा खंडित झाल्याने गणेशभक्तांचा हिरमोड झाला. गणेशमूर्ती विसर्जनाला या गलथान कारभाराचा फटका बसला. यामुळे गणेशभक्तांमधून हेस्कॉम कार्यालयात वारंवार फोन करण्यात येत होते. परंतु कर्मचाऱयांकडून योग्य उत्तरे मिळत नव्हती. यापुढे निदान महत्त्वाच्या दिवशी तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.









