कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
देशावर कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे तसेच कोरोना महामारी संपुष्टात आणण्यासाठी कोरोनाचे नियम पाळत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून सहकार्य करण्याचे आवाहन काकती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर यांनी केले.
कंग्राळी बुद्रुक येथे ग्राम पंचायत कार्यालयामध्ये शुक्रवारी बोलाविलेल्या शांतता समिती बैठकीमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा संध्या चौगुले होत्या.व्यासपीठावर ग्राम पंचायत उपाध्यक्ष अनिल पावशे, पीडीओ जी. आय. बर्गी, सेपेटरी सुनंदा एन. आदी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजविला. तिसऱया लाटेचेसुद्धा आगमन लवकरच होणार, असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. तेव्हा या महामारीला आळा घालण्यासाठी व आपल्या देशातून हद्दपार करून सुदृढ भारत बनविण्यासाठी येणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी केले.
पीडीओ जी. आय. बर्गी यांनी स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला. ग्राम पंचायत सदस्य जयराम पाटील, दादासाहेब भदरगडे, तानाजी पाटील, यल्लोजी पाटील, उमेश पाटील, मल्लेश बुडेनूर, रेखा इंडीकर, मेनका कोरडे, पूनम पाटील, भारता पाटील, वेदिका पठाणेसह गावातील सर्व गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









