विद्याधर पिंपळे/कोल्हापूर
दरवर्षी श्रावणानंतर गणेशोत्सव आणि त्यानंतर नवरात्रोत्सव काळात सुका मेव्याला प्रचंड मागणी असते. पण गेल्या पावणे दोन वर्षांच्या काळातील कोरोनाचा परिणाम सुकामेवा विक्रीवर झाला आहे. त्याचा अनुभवही येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सुका मेव्याच्या विक्रीत तब्बल 50 टक्के घट झाल्याने व्यापारी वर्गांत चिंतेचे वातावरण आहे. ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने शिल्लक साठÎाचे करायचे काय? असा प्रश्न व्यापाऱयांना पडला आहे.
कोल्हापूर ही सुकामेव्याची मोठी बाजारपेठ आहे. प्रत्येक महिन्याला सुका मेव्याची टनामध्ये विक्री असते. श्रावण, दसरा, दिवाळी यासह इतर सण, उत्सव काळात सुका मेवा प्रचंड प्रमणात खपतो. कोल्हापूरमध्ये होणाऱया विविध महाप्रसादाच्या काळात नेहमीपेक्षा 20 टक्क्यांने सुकामेव्याची मागणी वाढते, असा अनुभव आहे. पण गेल्या पावणे दोन वर्षात कोरोनाच्या निर्बंधामुळे सुकामेव्याच्या आयातीवर मर्यादा आल्या आहेत. त्यातच नेहमीची स्थानिक विक्री 50 टक्क्यांनी घटल्याने होलसेल आणि रिटेल व्यापाऱयांना फटका बसला आहे.
कोरोना आणि अफगाणिस्तानमधील बदलेल्या स्थितीचा परिणाम
आक्रोड, अंजीर, काळा मनुका या सुकामेव्यासह काही मसाल्यांच्या पदार्थांची आवक अफगाणिस्तानमधून होत असते. गेल्या पावणे दोन वर्षांत कोरोनाचे संकट आणि त्यानंतर गेल्या दोन तीन महिन्यांपासून अफगाणिस्तानातील बदलती राजकीय परिस्थिती आणि तालीबानने केलेला कब्जा याचा परिणाम सुकामेवा, मसाल्यांच्या आयातीवर मोठÎा प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे आवकेवर आलेल्या मर्यादा आणि त्यामुळे दरात झालेली वाढ याचा विक्रीवर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगतात.
कोरोनामुळे कमी झालेल्या उत्पनाचा सर्वांधिक फटका सुकामेव्याच्या खपावर झाल्याचे व्यापारी सांगतात. आर्थिक उत्पन घटल्याने खरेदी करताना ग्राहकांनी हात आखडता घेतला. त्यामुळे यंदाच्या श्रावणानंतर आताच्या गणेशोत्सवात सुकामेव्याची खरेदी झाली पण त्याचे प्रमाण घटल्याने खप निम्म्यावर आला. परिणामी साठा शिल्लक राहण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे यापुढे या शिल्लक साठÎाचे करायचे काय? या प्रश्नाने होलसेल आणि रिटेल व्यापाऱयांना ग्रासले आहे. पुढे असणारा नवरात्रोत्सव, दिवाळी या सणांकडे व्यापाऱयांच्या नजरा लागल्या आहेत.
निर्बंधामुळे सुकामेव्याची विक्री 50 टक्क्यांनी घटली
दरवर्षी सुकामेव्याची मागणी वाढते, त्याप्रमाणात पुरवठा करावा लागतो. नियोजन करून आयात केली जाते. यंदा कोरोनाच्या निर्बंधामुळे विविध सण, उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या. लोकांचे उत्पन्नही घटले. अफगाणिस्तानातील स्थितीमुळे आयातीवर परिणाम झाला. परिणामी खप 50 टक्क्यांहून कमी झाला आहे.
-चिंतन शहा, होलसेल सुकामेवा विक्रेते









