प्रतिनिधी/ रत्नागिरृ
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱया चाकरमान्यांच्या मार्गात अडचणी उभ्या येऊन ठाकल्या आहेत. क्वारंटाईनचा कालावधी ठरत नाही, एसटी-रेल्वेची सेवा बंद आणि अशातच आता गावी जाण्यासाठी ई-पासही लवकर मंजूर होत नाही आहे. त्यामुळे चाकरमान्यांची डोकेदुखी वाढली आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कोकणात गणेशोत्सव साजरा करता येणार की नाही, असा प्रश्न समोर उभा ठाकला
कोकणात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो. यामुळे मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरांतून लाखो चाकरमानी दरवर्षी या सणासाठी गावी जातात. गणरायाच्या आगमनाला आता 20 ते22 दिवस उरले आहेत. चाकरमान्यांच्या कोकण प्रवासाबाबत शासनाची भूमिका अजूनही सुस्पष्ट नाही. एस. टी., रेल्वे सुरू करण्याबाबत धोरण ठरलेले नाही. महामार्गावरील आवश्यक दुरुस्ती कामाचाही पत्ता नाही. एस.टी., रेल्वे सुरू न केल्यास गोरगरिबांचा खिसा चांगलाच फाटणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर ऋण काढून सण साजरा करण्याची वेळ येणार आहे. या पार्शवभूमीवर शासनाने तातडीने या सुविधा उपलब्ध न केल्यास चाकरमान्यांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे.
एसटी सोडायची की नाही, या बाबतही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. याशिवाय आता क्वारंटाईन कालावधीवरून राजकारण रंगले आहे. ऐनवेळी वाहतूक कोंडी तसंच इतर संकटांमध्ये अडकण्यापेक्षा चाकरमान्यांनी आतापासून गावाला जायची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी खासगी वाहनांचा पर्याय निवडला आहे. परंतु या मार्गातही त्यांना अडचणी येत आहेत. पोलिसांच्या वेबसाईटवर वैद्यकीय कारणांसाठी व अडकलेल्यांसाठी अशा दोनच कारणांसाठी ई-पासची व्यवस्था आहे. त्यामुळे नेमकं काय कारण द्यायचं, असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे.
एस टी., रेल्वे बंद ठेऊन खासगी वाहनाने प्रवासाला भाग पाडून सरकारकडून अप्रत्यक्ष खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आपणच निवडून दिलेल्या सरकारविरोधात असंतोष वाढतो आहे. या बाबत ठाकरे सरकारने वेळीच लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा असंतोषाला तोंड देणे अवघड होणार आहे. 7 दिवसांच्या विलगीकरणाचा निर्णय झाला आहे. 2 ते 3 दिवसात निर्णय जाहीर होईल, अशा बातम्या व्हायरल झाल्या आहेत. परंतु त्या बाबत अजूनही अधिकृत काहीच समोर आलेले नसल्याने शासनाच्या या वेळकाढू धोरणाबाबत संताप व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवासाठी या निर्णयाची होतेय मागणी
@ कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱया भक्तांसाठी विलगीकरण 7 ते 10 दिवसांचे असावे. त्या बाबत पुरेशी आधी घोषणा व्हावी.
@ ज्यांची स्वतंत्र घरे आहेत. त्यांचे गृह विलगीकरण करावे. घरातल्या घरात उत्सव साजरा करावा. अन्य घरी विलगीकारणात असताना जाऊ नये.
@मुंबईतून व राज्यातील अन्य ठिकाणच्या भक्तांना कोकणातील गावी येण्यासाठी खासगी वाहनासाठी 15 ते 20 हजार रुपये खर्चाचा सोसावा लागणारा भुर्दंड कमी व्हावा.
@मुंबईतून कोकणात येण्यासाठी 22 सीट प्रवासाचा विचार करून सामाजिक अंतर, फिटनेस प्रमाणपत्र आणि अन्य आवश्यक नियमांचे पालन करीत एस. टी. प्रवासाची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी.
@त्यासाठी आरक्षण ऑनलाईन सुरू करावे. यामुळे 15 ते 20 हजार खर्च न होता 4 ते 5 हजारात प्रवास होईल व 10 ते 15 हजार अनावश्यक खर्च वाचेल.
@ज्यांची स्वतःची वाहने आहेत किंवा ज्यांना मोठी रक्कम देवून खासगी वाहनाने जाणे शक्य आहे, त्यांना तसे करू द्यावे. परंतु एवढा खर्च परवडत नाही अशा हजारो लोकांना एस.टी. उपलब्ध करून द्यावी.
@नियमांचे पालन करून प्रवासी वाहतूक कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यासाठी शासनाने कोकण रेल्वेलाही आदेश देणे गरजेचे आहे.
@मंत्री अशोक चव्हाण यांनी घोषणा केल्यानुसार कोकणात भक्तांना उत्सवासाठी येण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून महामार्ग व महत्वाचे मार्ग यांची दुरुस्ती तातडीने करावी.
@चाकरमान्यांना प्रवासी पास विनाविलंब मिळावेत, यासाठी पारदर्शक यंत्रणा तयार करावी.
@कोरोना नियमांचे काटेकोपणे पालन होण्यासाठी योग्य नियमावली जारी करावी.









