शहरातील वाहतूक कोंडी टाळणार
ग्राहक-गणेश भक्तांना सेवासुविधा वाहनांची पार्किंग व्यवस्था नगराध्यक्ष ओंकार तेली यांची माहिती
वार्ताहर / कुडाळ:
गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळता यावी. तसेच ग्राहक व गणेश भक्तांना चांगल्या पद्धतीने सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात, गर्दी होऊ नये, यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्यावतीने 17 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
यावषीच्या या सणाच्या कालावधीकरिता नियोजन न. पं. ने जाहीर केले आहे. चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था येथील हॉटेल अनंत-मुक्ताईसमोर व न्यायालयाच्या परिसरात करण्यात आली आहे.
डंपर वाहतूक धारकांना पोस्टासमोरील कुडाळ-मालवण रस्तामार्गे कुडाळ शहरामध्ये प्रवेश करण्यास 17 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. बाहेरच्या गावांतून येणाऱया खासगी बसेसना कुडाळ बाजारपेठमार्गे न येता महामार्गावरून सोडण्यात याव्यात. ज्या खासगी बसेस बाजारपेठमार्गे येतील, त्या बसेसवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
कुडाळ-जिजामाता चौक ते नक्षत्र टॉवरकडील माठेवाडा रस्त्यापर्यंत दुचाकी वाहनांसाठी एक दिवस आड करून दोन्ही बाजूने विषम संख्येने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नक्षत्र टॉवरसमोर गटाराच्या आतील बाजूस भाजी
विपेत्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
कुडाळ-जिजामाता चौक ते शिवाजीनगर, रामेश्वर स्टोअर्स ते गांधी चौकापर्यंत व कुलकर्णी झेरॉक्स बिल्डिंगच्या बाजूला याठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ तयार करण्यात आले आहेत. कुडाळ-कुलकर्णी झेरॉक्स बिल्डिंग ते माळगावकर दुकानापर्यंत एका बाजूने दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गांधीचौक ते ओटवणेकर तिठय़ापर्यंतचा मार्ग सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तीनचाकी व चारचाकी वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
नियमांचे पालन आवश्यक
कोरोना प्रादुर्भाव सुरू असल्याने या गणेश चतुर्थीच्या कालावधीत प्रत्येक व्यक्तीने कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनर, सॅनिटायझरचा वापर करणे. तसेच मास्क लावणे, सामाजिक अंतर किमान सहा फूटांचे ठेवणे व पाचपेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार नाही, याचे पालन करणे आवश्यक आहे. दुकानांची वेळ शासन निर्णयाप्रमाणे सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत राहणार आहे.
..तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार
बाजारपेठेत भाजी विपेते किंवा अन्य कोणतेही विपेते यांच्या दोन दुकानांमधील अंतर किमान पाच फुटांचे असणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या 29 जुलै 2020 रोजीच्या आदेशान्वये गणेश भक्तांसाठी दहा दिवसांचे गृह विलगीकरण करण्यात आलेले आहे. सदरहू बाहेरील गावातील येणाऱया व्यक्तींनी किमान दहा दिवस घराच्या बाहेर पडू नये. गृह विलगीकरण केलेली कोणतीही व्यक्ती घराच्या बाहेर पडलेली आढळून आल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.
‘कोरोना’ प्रादुर्भावविषयक बॅनर लावणार
‘कोरोना’ प्रादुर्भावविषयक बॅनर सर्व ठिकाणी लावण्यात येणार आहेत. नगरसेवक जीवन बांदेकर यांनी अशी सूचना केली आहे की, गांधीचौक ते ओटवणेकर तिठय़ापर्यंत वाहने पार्क करू नये. भंगसाळ पूल व महापुरुष मंदिर येथील गणेशघाट साफ करणे व जेथे चिखल होत असेल, त्या ठिकाणी गिरीट मारण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनासाठी जेटी
गणेश विसर्जनासाठी जेटी मिळण्यासाठी तहसीलदारांना पत्र देऊन जेटी घेण्यात येणार आहे, असे तेली यांनी म्हटले आहे.









