गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने कोरोनालाही तोंड देण्याची तयारी ठेवत कोकणात चाकरमानी येणारच. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची कोरोना नियंत्रणाची कसोटी लागणार आहे.
मुंबईमध्ये काही प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना कोकणामध्ये मात्र आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. गणेशोत्सवासाठी आता रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात दोन लाखाहून जास्त चाकरमानी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिकच वाढला असून स्थानिकांमध्येही होणारे कोरोनाचे संक्रमण चिंतेचे ठरले आहे.
यावर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली असल्याने नेहमीचा उत्साह कमी होऊ न देता प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करून तो साजरा करण्याची कसरत करावी लागणार आहे. कोरोनाचे संकट देशावर आल्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस कोकणातही कोरोनाचा शिरकाव होऊन कोरोनाचे संकट ओढवले. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ांनी सुरुवातीला कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले. रत्नागिरी जिल्हय़ात थोडय़ा अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले. मात्र सिंधुदुर्गात जिल्हा प्रशासनाचे उत्तम नियोजन, ग्राम नियंत्रण समित्यांची मेहनत आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे कोरोना नियंत्रणात राहिला. मात्र गेल्या महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून आठवडाभरात ते झपाटय़ाने वाढले आहेत. गणेशोत्सव काळात तर अधिकच मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या गणेशोत्सवाला दरवर्षी दोन-अडीच लाख चाकरमानी येतात. तेवढय़ा प्रमाणात आले, तर कशा पद्धत्तीने आणायचे आणि आल्यावर काय नियोजन असेल याची चर्चा आणि नियोजन गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. कोरोनाच्या संकट काळातही चाकरमानी गणेशोत्सवाला आले पाहिजेत. परंतु, कोरोनालाही रोखता आले पाहिजे. याची सांगड घातली गेली आणि चाकरमानी 12 ऑगस्टपर्यंत आल्यास त्यांना दहा दिवसांचे गृह विलगीकरण आणि 12 ऑगस्टनंतर आल्यास कोविड-19 चाचणी 48 तास अगोदर करून आले पाहिजे. त्यांच्यासाठी तीन दिवसांचे विलगीकरण तसेच एसटीने येणाऱया चाकरमान्यांना ई-पासाची गरज नाही, असेही जाहीर केले गेले. त्यानंतर आता कोकण रेल्वेच्या विशेष गाडय़ाही सोडण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आणि चाकरमानी मोठय़ा संख्येने कोकणात येऊ लागले आहेत.
चाकरमानी कोकणात आल्यावर जिल्हय़ाच्या प्रवेशद्वारावरच त्यांची आरोग्य तपासणी करणे तसेच लक्षणे दिसल्यास कोविडची तपासणी करायला सुरुवात केली गेली. अशा प्रकारचे नियोजन केल्यामुळे जिल्हय़ाबाहेरून येणाऱया चाकरमान्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण असल्यास ते शोधणे सोपे होत आहे. अशा परिस्थितीतही कोरोनाची लक्षणे न दिसणाऱया काही व्यक्तींना उशिराने कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्हय़ात स्थानिकांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोकणामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यांत कोरोनाबाधित रुग्ण कुठून आला, त्याला कुठून लागण झाली, याची माहिती मिळत होती. मात्र आता कोरोनाचा प्रवास समजून येत नसल्याने स्थानिकांमध्ये कोरोनाचे संक्रमण होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना गणेशोत्सवासाठी दोन्ही जिल्हय़ात दोन लाखाहून जास्त चाकरमानी येण्याची शक्यता असल्याने कोरोनाचा धोका तर वाढणारच, परंतु स्थानिकांमध्येही संक्रमणाचा धोका वाढू शकतो, ही मोठी चिंता आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
गणेश आगमन व विसर्जनाच्यावेळी मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुका काढू नयेत, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना विसर्जनाच्यावेळी नेऊ नये, गर्दी टाळण्यासाठी प्रामुख्याने आरत्या, भजने, फुगडय़ा, गौरी, वसा यासारखे कार्यक्रम घरगुती स्वरुपात करावेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने घरोघरी फिरून भेट देणे टाळावे, गणपतीची पूजा करण्यासाठी पुरोहिताना न बोलावता शक्यतो स्वत: पूजा करावी. ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करावा. गणेशोत्सव कमीत कमी दिवसांचा करावा. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश दर्शनासाठी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. शारीरिक अंतर, स्वच्छतेचे नियम पाळावेत. मंडप व्यवस्था भपकेबाज करू नये. मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात यावी. गणेश दर्शन ऑनलाईन देण्याचा प्रयत्न करावा, अशा या मार्गदर्शक सूचना आहेत.
कोकणामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणपतीचेच प्रमाण अधिक आहे. दोन्ही जिल्हय़ात दोन लाखाहून जास्त घरगुती गणपती विराजमान होतात. त्यामुळे कोरोना संकट काळात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हय़ाबाहेरून येणाऱया चाकरमान्यांना जिल्हा प्रशासनाकडून घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्याच लागतील. तरच कोरोनावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. अन्यथा मुंबईप्रमाणे कोकणही कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ शकतो.
दोन्ही जिल्हय़ात कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत असताना गणेशोत्सव काळात त्यात अजूनही मोठी वाढ होणार असल्याने आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण येणार आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने कोरोनालाही तोंड देण्याची तयारी ठेवत कोकणात चाकरमानी येणारच. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची कोरोना नियंत्रणाची कसोटी लागणार आहे. गणेशोत्सवातच कोरोना संकटावर मात करण्यास यश मिळाले, तर निश्चितच कोकणावरील कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर होऊ शकते. स्थानिकामध्ये वाढणारे संक्रमण चिंतेची बाब ठरली आहे. त्याबाबतही गणेशोत्सवातील गणेशभक्ताचा उत्साह कमी होऊ न देता नियमाची सांगड घालून कोरोना संकट परतवून लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
संदीप गावडे








