उचगाव भागामध्ये काकती पोलीस ठाण्यातर्फे दिले आदेश : कायद्याचे उल्लंघन करणाऱयाविरुद्ध कारवाई
वार्ताहर/ उचगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शासनाने घालून दिलेल्या अटींचे सर्वांनी पालन करावे, असे परिपत्रक शुक्रवारी सायंकाळी उचगाव भागामध्ये काकती पोलीस स्थानकातर्फे गणेशोत्सव मंडळांना भेटून देण्यात आले.
परिपत्रकांमध्ये प्रामुख्याने कोणत्याही गावातील गणेशोत्सव मंडळांनी मंडप घालू नये, मंदिरातून मूर्तीपूजन करावे, यासाठीही परवानगी घेणे जरुरीचे आहे. डॉल्बी साऊंड सिस्टिम, फटाके, गुलाल यावर सक्त मनाई आहे. मूर्तीची उंची चार फुटापेक्षा अधिक असू नये, गणेशोत्सव काळात मंडळांनी कोठेही गर्दी करू नये, सामाजिक अंतर ठेवून सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी असणार आहे. आरतीला पाच नागरिक असावेत, विसर्जनावेळी मिरवणुकीवर बंदी आहे, अशा प्रमुख अटी घालण्यात आल्या आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांरुद्ध आपत्ती निवारण कायदा 2005 व 188 अन्वये कारवाई करण्याचा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
या संदर्भात बेळगाव तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी बैठक घेऊन याबाबत चर्चा करावी. तसेच तालुक्यातील संबंधित पोलीस स्थानकाला गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांनी भेटून परवानगी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे..









