“कुंभार समाजाकडून मातीचे घट तयार करण्याची लगबग
प्रतिनिधी / सांगली
गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. कोरोना व महापुराच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठेत अजूनही काहीच रागरंग दिसत नसला, तरी शहरातील कुंभार समाजाकडून मातीचे घट तयार करणे व कलाकुसरसह रंगविण्याची लगबग सुरु झाली आहे.
शहरामध्ये गुजराती समाजाच्यावतीने दरवर्षी रतनशीनगर येथे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर शहरातील विविध भागांमध्येही सार्वजनिक मंडळांच्यावतीने गरबा व रासदांडियाचा खेळ खेळला जातो. नवरात्रोत्सवाला काहीच दिवस उरले असल्याने इच्छुकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही नवरात्रौत्सवावर वेळेचे, तसेच सोशल डीस्टन्स अशी थोडीफार बंधने असणार आहेत. २०१९ ला महापूरामुळे, तसेच गतवर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव व नवरात्र थोड्या कमी उत्साहातच साजरी झाली. तर यंदाही महापूर व कोरोनाच्या दुहेरी संकटामुळे गरबा, रासदांडिया खेळणाऱ्या भाविकांसमोर साशंकतेचे चिन्ह आहे. शहरातील कुंभार समाजाकडून मात्र मातीचे घट तयार करणे, आकर्षक पद्धतीने रंगविणे, कलाकुसर करणे आदी कामे सुरु झाली आहेत.
नवरात्रीसाठी दागदागिने, पेहराव यांची रेलचेल
नवरात्रोत्सवासाठी वापरण्यात येणारे दागदागिने व पेहराव यांची किंमत जास्त आहे. बाजारामध्ये दीड ते साडेतीन हजार रुपयापर्यंत त्यांची विक्री होत असते. मात्र भाड्याने मिळणारे दागिने व पेहरावाचा साज ३०० ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध होत असतो. त्यामुळे जादा पैसे देवून कपडे खरेदी करण्यापेक्षा भाडयाने कपडे घेणे जास्त परवडत असल्याने काही विक्रेत्यांकडे अशा पेहरावांना मोठी मागणी असते. त्यामुळे या विक्रेत्यांचीही थोडीफार लगबग सुरु झाली आहे.
Previous Article‘तो’ व्हिडीओ बनावट : डी.व्ही.सदानंद गौडा
Next Article मुद्रांक व नोंदणी कर्मचारी बेमुदत संपावर








