प्रतीक्षा यादी वाढल्याने आरक्षण देणेही बंद
राजू चव्हाण/ खेड
कोरोना नियंत्रणात आल्याने दोन वर्षानंतर गणेशोत्सवात गावी जाण्याचा मार्ग सुकर झाला असला तरी नियमित गाडय़ांतील संपलेल्या आरक्षण क्षमतेचा मोठा अडसर उभा ठाकला आहे. 26 ते 30 ऑगस्ट या कालावधीतील नियमित गाडय़ांच्या विविध श्रेणीतील सर्व आसने आरक्षित झाल्याने असंख्य चाकरमानी वेटिंगवरच होते. त्यातच प्रतीक्षा यादी वाढल्याने रेल्वे प्रशासनाने आरक्षण देणेही बंद केल्याने गणेशभक्त कोंडीत अडकले आहेत. यामुळे चाकरमान्यांच्या नजरा आता गणपती स्पेशल गाडय़ांच्या घोषणेकडे खिळल्या आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे सलग 2 वर्षे गावी जाण्याची चाकरमान्यांची संधी हुकली होती. यंदा ही कसर भरून निघणार आहे. त्यातच यावर्षी 26 ऑगस्टपासूनच गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवात 3 ते 4 दिवस आधीच गाव गाठणाऱयांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे 28 एप्रिलपासून नियमित गाडय़ांचे आरक्षण खुले होताच आरक्षित तिकिटांसाठी खिडक्यांवर गणेशभक्तांची झुंबड उडाली होती. मात्र तासन्तास तिकीट खिडक्यांवर उभे राहूनही पदरी निराशाच पडली. मात्र तासांतच नियमित गाडय़ांचे आरक्षण फुल्ल होऊन असंख्य प्रवासी वेटिंगवर राहिले होते. ही प्रतीक्षा यादीही मोठी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने आरक्षण देणेच बंद केल्याने गणेशभक्तांसमोर मोठा अडसर निर्माण झाला आहे. मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेसचे रत्नागिरीपर्यंत शयनयान श्रेणीचे आरक्षण 27 ते 30 ऑगस्टपर्यंत उपलब्ध नाही. याच एक्स्प्रेसची 26 व 31 ऑगस्टला 200 हून अधिक प्रतीक्षा यादी आहे. वातानुकूलित तिसऱया श्रेणीसाठीही 28 ते 30 ऑगस्टला प्रतीक्षा यादी लागली आहे.
सीएसएमटी मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेससाठीही 27 ते 30 ऑगस्टपर्यंत शयनयान श्रेणीचे व वातानुकूलित तिसऱया श्रेणीसाठी 27 ते 29 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा यादी जास्त झाल्याने आरक्षण उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. वातानुकूलित दुसऱया श्रेणीचे आरक्षणही प्रवाशांना मिळालेले नाही. सीएसएमटी मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या द्वितीय आसन श्रेणीचे 27, 28, 30 व 31 ऑगस्टचे आरक्षण उपलब्ध नाही. दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसच्या शयनयान श्रेणीचे 27 ते 31 ऑगस्ट तसेच वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे 28, 29 ऑगस्ट तर एलटीटी-त्रिवेंद्रम नेत्रावती एक्स्प्रेसच्या शयनयान श्रेणीचे 28 ते 30 ऑगस्टपर्यंत आरक्षण उपलब्ध नाही. एलटीटी-मडगाव डबलडेकर व लोकमान्य टिळक टर्मिनस-मेंगलोर मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्स्प्रेससह अन्य गाडय़ांच्या काही श्रेणींचे आरक्षण उपलब्ध नसून प्रतीक्षा यादीही खूपच वाढली आहे. यामुळे चाकरमान्यांची सारी मदार गणपती स्पेशल गाडय़ांवरच असून रेल्वे प्रशासनाच्या घोषणेकडे गणेशभक्तांच्या नजरा रोखल्या आहेत.









