प्रतिनिधी / पणजी
गणेश चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवरच येऊन ठप्पली आहे. यानिमित्ताने चतुर्थीची खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मार्केट परीसरात गर्दी पाहायला मिळाली आहे. तसेच बहुतेक सर्वजणांनी घरांची सजावट व श्री गणेश स्थानपन्न होणाऱया जागेची सजावटीला सुरुवात केली आहे.
गणेश देवाचे आगमन होत असल्याने गोव्यात हर्षोल्हासाचे वातावरण आहे. कोरोनामुळे मोठे संकट सध्या राज्यात आहे, या पार्श्वभूमिवर राज्यातील अनेक ठिकाणी फक्त दीड दिवस गणेश चतुर्थी साजरी करण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहे यामुळे अनेक जणांनी साध्या पध्दतीने चतुर्थी साजरी करण्याचे ठरविले आहे. परंतु त्तापुर्ती सर्व वाईट गोष्टी विसरुन लोकांनी गणेश देवाच्या आगमनाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. घरा घरांमध्ये देखील तयारी पाहायला मिळत आहे.

सुबक गणेशमुर्तीनी चित्रशाळा गजबजल्या
काही दिवसांवर गणेश चतुर्थी आल्याने पणजीसह संपूर्ण राज्यातील ठिकठिकाणी चित्रशाळांमध्ये गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या आवडीची गणेशमूर्ती या चित्रशाळांमध्ये जाऊन गणेशभक्त आगाऊ नोंदणी करत आहेत. विविध प्रकारच्या सुबक सुंदर अशा गणेशमूर्तींनी चित्रशाळा गजबजल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर व्यवसायाबरोबरच गणेशमूर्तीकारांनाही फटका बसला आहे. त्यामुळे मूर्तीचे दर काही प्रमाणात वाढलेले दिसून येतात. विशेष म्हणजे काही चित्रशाळांमध्ये नेहमीपेक्षा उपलब्ध असलेल्या मूर्तींची संख्या कमी प्रमाणात दिसून येते. याशिवाय चिकणमातीच्या किंमतीत वाढ आणि कामगारांच्या अभावामुळे गणेशमूर्ती दराला मोठा फटका बसला आहे.
पारंपारिक गणेशमूर्तीना मोठी मागणी
पारंपारिक गणेश मूर्तिकारांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. पारंपारिक गणेशमूर्तींना सध्या मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पारंपारिक गणेशमूर्तीची अनेक चित्रशाळा उपलब्ध आहेत. या चित्रशाळांमध्ये 200 ते 7000 रूपये, तर काहींकडे 1000 रूपये ते 10 हजारांपर्यंतच्या आकारानुसार गणेशमूर्ती विकल्या जात आहेत.
पंचायत व पालिका स्तरावर देखील विविध तयारी
सध्या कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत चालले आहे. या अनुषंगाने अनेक पंचायत व पालिकांनी लोकांना दिड दिवस गणेश चतुर्थी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गणेश विसर्जनाच्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक वाडा किंवा प्रभागासाठी विसर्जनाच्या दिवशी वेळेची मर्यादा घातली आहे. तसेच विर्सजनावेळी मास्क, व सामाजिक दुरी ठेवण्याचे आवाहन केले आहे.









