कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर,रिक्षा चालकाला अटक
प्रतिनिधी / बेळगाव
किरकोळ अपघातानंतर सर्व्हेक्षणासाठी निघालेल्या आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. सोमवारी सकाळी गणेशपूर परिसरात ही घटना घडली असून कॅम्प पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत पाच जणी जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी रिक्षा चालकाला अटक केली असून जखमी अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. विनायक प्रकाश खोरागडे (वय 40, रा. गणेशपूर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
जया परशराम खेमजी (वय 55), रुपा संभाजी मुसळे (वय 35), मंदा विष्णू नेवगी (वय 48), ज्योती जगन्नाथ हतगळे (वय 49), लक्ष्मी रामू पाटील (वय 42, सर्व रा. गणेशपूर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. ज्योतीनगर येथील बीसीएम हॉस्टेलजवळ ही घटना घडली आहे.

या संबंधी बेळगुंदी आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य कार्यकर्त्या जया खिमजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.वि. 323, 324, 354, 504, 506 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चालकाने या महिलांना मारहाण करण्याबरोबरच जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या व आरोग्य विभागाच्या कार्यकर्त्या सर्व्हेक्षणासाठी जात होत्या. त्यावेळी रुपा मुसळे या आपल्या दुचाकीवरुन येताना आटोरिक्षाची दुचाकीला धडक बसली. किरकोळ अपघातानंतर या महिला कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकाला व्यवस्थीत रिक्षा चालव, असा सल्ला देताच त्यांनी या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.









