प्रतिनिधी/ बेळगाव
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण केले जाते. शाळेच्या प्रारंभोत्सवादिनीच गणवेशासाठीचे कापड वितरित करून गणवेश शिवून घेण्याच्या सूचना केल्या जातात. मात्र कोरोनाच्या संकटात वर्षारंभ अडकल्याने गणवेशाचे वितरणच झालेले नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात गणवेशासाठी लागणाऱया कापडाचे वितरण शाळास्तरावर करण्यात आले असून 2020-2021 या शैक्षणिक वर्षातील पहिला गणवेश जोड विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
1 जानेवारीपासून विद्यागमअंतर्गत शाळा सुरू होणार आहेत. क्लस्टरनिहाय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन गणवेश देण्यात आले आहेत. यामुळे विलंबाने का होईना विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध झाला आहे.
बैठकीचे आयोजन
विद्यागम योजना सुरू होण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र खूप आवश्यक आहे. यामुळे एसडीएमसीची बैठक घेऊन विद्यागमबाबतच्या व्यवस्थेची संपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. शिवाय पालकांची बैठक घेऊन विद्यागमसाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची संमती घेण्याबरोबरच गणवेशाचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थी शाळेत येताना गणवेशातच येणार आहेत.
दुसरा जोड विलंबाने
गतवर्षीचा दुसरा गणवेश जोड वर्षाच्या अखेरीला देण्यात आला होता. यंदा मात्र शाळाच बंद असल्याने पहिल्या सत्रातील गणवेश जोड सध्या वितरित करण्यात येणार आहे. तर दुसरा गणवेश जोड खरेदीसाठीचा निधी विलंबानेचे उपलब्ध होणार आहे.









