जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांची माहिती : सरकारी शाळांच्या पटसंख्येत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
शाळांनी मागणी केल्याप्रमाणे यंदा 1 लाख 96 हजार 871 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. मात्र पटसंख्येत वाढ झाल्याने 13 हजार 321 विद्यार्थी गणवेश लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यांना गणवेश मिळण्याची शक्मयता धूसर असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात प्राथमिक शाळांमध्ये 81 हजार 526 विद्यार्थी तर 88 हजार 746 विद्यार्थिनी तसेच माध्यमिक विभागात 16 हजार 967 विद्यार्थी आणि 18 हजार 263 विद्यार्थिनींसाठी गणवेशाची मागणी केली होती. त्यापैकी 1 लाख 96 हजार 871 विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरण करण्यात आले तर 13 हजार 321 विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.
दरवषी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केले जाते. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद राहिल्याने गणवेश वितरण करण्यात आले नव्हते. यंदा मात्र शैक्षणिक वर्षपूर्तीच्या तोंडावर गणवेश वितरण पूर्ण करण्यात आले. अचानक पटसंख्या वाढल्याने 13 हजार 321 विद्यार्थी वंचित राहिल्याचे नलतवाड म्हणाले.
विद्यार्थिनी लाभार्थी अधिक
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. 31 जानेवारीपर्यंत 1 लाख 3 हजार 375 विद्यार्थिनी तर 93 हजार 496 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचा तालुकानिहाय तपशील
| तालुका | लाभार्थी | वंचित विद्यार्थी |
| बेळगाव शहर | 17582 | 1482 |
| बेळगाव ग्रामीण | 40431 | 1796 |
| बैलहोंगल | 25849 | 2769 |
| खानापूर | 24437 | 690 |
| सौंदत्ती | 43478 | 3391 |
| रामदुर्ग | 30927 | 1551 |
| कित्तूर | 14167 | 1642 |
| एकूण | 1,96,871 | 13,321 |









